sanjay Raut | महाविकास आघाडी सरकार जाणार? पत्रकार संजय राऊतांचा अभ्यास काय सांगतो?
कालपासून संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत हेदेखील गुवाहटीला जाणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी सुनिल राऊतांना थेट सर्वांसमोर बोलावलं आणि पत्राकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.
मुंबईः तगडे आमदार आणि मंत्र्यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेनेला मोठा तडा बसलाय. यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या गुवाहटीत वास्तव्यास असेलेले आमदार कोणत्याही क्षणी मुंबईत येतील. भाजप त्यांच्यासोबत मिळून सत्तास्थापनेचा दावा करू शकेल. असं झालं तर महाविकास आघाडी कोलमडून पडू शकते. सध्या तरी याच शक्यता स्पष्ट दिसतायत. शिवसेनेच्या या स्थितीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कधी भावनिक आवाहन केलं तर कधी अत्यंत आक्रमक भाषा वापरली. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटानं सत्तेची दोरी ताणून धरलीय आणि हा वाद आता सुप्रीम कोर्टातही गेलाय. शिवसेना खासदार म्हणून संजय राऊतांना आपले आमदार आपल्याकडे परत येतील, अशी आशा वाटतेय. पण एक पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता, महाविकास आघाडी सरकार पडेल का? असे प्रश्न विचारले असता राऊतांनी स्पष्टच उत्तर दिलं.
काय म्हणाले संजय राऊत?
महाविकास आघाडी सरकार जाणार का, या प्रश्नाचं उत्तर एक शिवसेना खासदार म्हणून नाही तर पत्रकार म्हणून द्या, असं विचारल्यावर संजय राऊतांनी वास्तविक स्थिती सांगितली. सद्यस्थिती पाहता, महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे गटाची ही परीक्षा फ्लोअर ऑफ द हाऊसलाच होईल, असं राऊत म्हणाले. म्हणजेच महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल होईल हे नक्की. या परीक्षेत आम्हीच चांगल्या प्रकारे पास होऊ, असे राऊत म्हणाले असले तरीही हे विधान पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार म्हणूनच आलं असावं. फ्लोअर टेस्ट आणि रोड टेस्ट या दोन्ही परीक्षा आम्ही देणार आहोत, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे शिवसेनेला आता रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागणार आहे, हे स्पष्ट आहे. एवढे आमदार फुटल्यानंतर नवी शिवसेना उभी करण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागणार. यासाठीची मोहीम शिवसेनेनं हातातही घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेतर्फे विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत .
संजय राऊतांचे भाऊही गुवाहटीला?
कालपासून संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत हेदेखील गुवाहटीला जाणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी सुनिल राऊतांना समोर बोलावलं. सुनिल राऊत कुठेही गेले नाहीत आणि जाणारही नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. तसंच मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर आमदारांकडे गेलेत की त्यांना पाठवलं गेलंय, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, उदय सामंत गेलेत की पाठवलंय, याचंही उत्तर भविष्यात नक्की मिळेल.