आदित्य ठाकरे ठाण्यातून लढणार? ओघात बोलले की राजकीय डाव? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील मोर्चात मी ठाण्यातून निवडणूक लढणार अशी घोषणा करत आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्जत : गुरुवारी ठाण्यात काढलेल्या जनप्रक्षोभ मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत असतांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ठाण्यातून निवडणूक लढणार असे सांगत आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच आक्रमक भाषण पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. आदित्य ठाकरे खरंच ठाण्यातून निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे सध्या वरळीचे आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच आदित्य ठाकरे लढणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य करणं टाळलं होतं. लोकशाहीने सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे मी त्यावर काय बोलणार असं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकचे भाष्य केले नव्हते.
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर त्यावरून टीका केली होती. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येणे शक्य नाही त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली अशी टीकाही झाली.
त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. कर्जत येथील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले असून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार की नाही याबाबत संकेत दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीचे वातावरण आहे. ते पाहता आदित्य ठाकरे कुठेही उभे राहिले तर आदित्य ठाकरे निवडून येतील. मुंबईत राहुद्यात किंवा ठाण्यात राहुद्यात आणखीन महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढू द्या आदित्य ठाकरे निवडून येतील.
आमचा नेता आहे. ठाकरे नाव आहे. त्यामुळे कुठेही निवडून येण्याची ताकद आहे. आदित्य ठाकरे जर ठाण्यातून लढले तर महाराष्ट्रासाठी ती निवडणूक प्रेरणादायी असेल. आमचा नेता बेडरपणे बेइमानांचं ज्याने नेतृत्व केलं त्याच्या विरोधात ठामपणे लढत आहे आणि ते देखील जिंकण्यासाठी. त्याच्यातून महाराष्ट्राला एक संदेश जाईल असे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी वरळीत येऊन लढून दाखवा नाहीतर मी ठाण्यात येऊन लढतो असे आव्हान दिले होते. तेव्हाही आदित्य ठाकरे यांचे आव्हान संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच ठाकरे होते जे निवडणूक लढले आणि जिंकून देखील आले होते.