संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, आता थेट एकनाथ शिंदे हेच अडचणीत येणार?
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका वक्तव्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केलीय. त्या मागणीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.
कोल्हापूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना (Neelam Gorhe) पत्र पाठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा देशद्रोह असा उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा, अशी मागणी दानवे यांनी केलीय. त्यांची ही मागणी अतिशय योग्य असल्याचं मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. “संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांचं स्थान हे सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने नव्हे तर त्यापेक्षा वर आहे. आपण संसदीय लोकशाहीची जी पद्धत स्वीकारलेली आहे”, त्या लोकशाहीमध्ये विरोधकांचं स्थान हे उच्च आहे, असं संजय राऊत म्हणाले.
“पंडित नेहरुंपासून ते मनमोहन सिंह यांच्यापर्यंत, प्रत्येक पंतप्रधान, राष्ट्रपती, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज नेहमी ऐकला आहे. जेव्हा तो आवाज दडपण्याचा प्रयत्न आणीबाणीच्या माध्यमातून झाला तेव्हा तो त्या सत्ताधाऱ्याचा पराभव देशातील जनतेने केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका योग्य आहे. मुख्यमंत्र्यांचं विधान हे विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“खरंतर ते सध्या ज्या समितीमध्ये वावरत आहेत त्याचा हा परिणाम आहे. त्यांनी सुसंगत सोडलेली आहे आणि ते कुसंगतीला लागले आहेत. त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य आणि इतर अनेक विषय आहे त्यांच्याशी संबंध तुटला. पण आम्ही अजूनही लोकशाही मानतो, नाहीतर निवडणुका लढवण्यात काही अर्थ नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“सर्वोच्च न्यायालय हा आशेचा एकमेव किरण सध्या या देशासाठी आहे. बाकी सर्व मंदिरं ही नावाची मंदिरं राहिली आहेत. त्या मंदिरात चप्पल चोरांचीच गर्दी जास्त आहे. पण सर्वोच्च न्यायालय हे आजही लोकशाही, स्वातंत्र्य, जनता, सर्वसामान्यांसाठी एकमेव आशेचा किरण आहे. आम्ही सगळे लोकशाहीचे कार्यकर्ते हे सर्वोच्च न्यायालयाकडे फार अपेक्षेने पाहत आहेत. आम्हाला खात्री आहे, तिथे निकाल लागणार नाही तर न्याय मिळेल”, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं होतं. पण विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. विरोधकांच्या या कृतीवर एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली. “अजित पवार म्हणाले, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. बरं झालं ते चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाही. मी तर असं सांगतो, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण. तिला यांनी चेक दिलेत. ज्यांनी देशद्रोह केला त्यांचा राजीनामा घेण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही. बरं झालं! त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिणं टळलं. बरं झालं! महाराष्ट्रद्रोह मोठा की देशद्रोह मोठा?”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला होता.