Breaking | एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा मोठा गट अस्वस्थ, काहीतरी गडबड… संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे गटाचे समर्थक 3 आमदार आणि 1 खासदार हे अयोध्या दौऱ्यात शामिल झाले नसल्याने चर्चांना उधाण आलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता नव्याच चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचं (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर याच धनुष्यबाणाची पूजा करण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह अयोध्येत गेले खरे. पण त्यांच्यासोबत ३ आमदार आणि १ खासदार गेले नाहीत. या चौघांच्या अनुपस्थितीवरून आता चर्चांना उधाण आलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून मोठा दावा केलाय. शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असल्याचं राऊत म्हणालेत. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटातील अस्वस्थतेबाबत मोठा दावा केलाय.
काय म्हणाले राऊत?
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात काही आमदार आणि खासदार गैरहजर होते. यावरून सुरु झालेल्या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात आमदारांचा एक मोठा गट गेला नाही. ते अस्वस्थ आहेत. काहीतरी गडबड आहे, असं मीदेखील ऐकतोय. लवकरच काही गोष्टी पुढे येतील
कोण गैरहजर होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्येतील दौऱ्यात शिंदे गटातील बहुतांश आमदार आणि खासदारांचा समावेश होता. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, तर खासदार भावना गवळी या अनुपस्थित होत्या. हे चौघं अयोध्या दौऱ्यात का शामिल झाले नाहीत, यामागे एक मोठं रहस्य असल्याचं सूतोवाच ठाकरेंच्या शिवसेनेनं केलंय.
बेदिलीची ठिणगी, सामनातून भाष्य
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून 4 जणांच्या गैरहजेरीवरून मोठं सूतोवाच केलंय. त्यात लिहिलंय, आता मिंधे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. मिंधे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे. त्यामुळे अयोध्येत उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल, असा गर्भित इशाराही सामनातून देण्यात आलाय.
वैयक्तिक कारणानं गैरहजेर?
एकनाथ शिंदे गटाचे समर्थक 3 आमदार आणि 1 खासदार हे अयोध्या दौऱ्यात शामिल झाले नसल्याने चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांचे वारंवार सरकारविरोधात करण्यात आलेली वक्तव्य, सुप्रिया सुळेंवरील टीकेवरून घेरले गेलेले अब्दुल सत्तार, यांच्यासह शहाजी बापू पाटील आणि भावना गवळी नेमक्या कोणत्या कारणामुळे अयोध्येत गेले नाहीत, हे तपासून पाहिलं जातंय. तूर्तास तरी काही वैयक्तिक कारणामुळे हे चौघं या दौऱ्यात शामिल झाले नाहीत, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. मात्र संजय राऊत यांनी शिंदे गटात काहीतरी गडबड असल्याचं म्हटलंय. तसंच आगामी मंत्रिमंडळ विस्तारदेखील होणार नसल्याचं भाकित केलंय. भाजप आणि शिंदे समर्थित आमदारांनी मंत्रिपदासाठीची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे शिंदे गटात नेमकं कोण कोण अस्वस्थ आहे,याचे चित्र आगामी काळात स्पष्ट होईल.