ST Andolan Mumbai : कुठली तरी अज्ञात शक्ती, राऊतांची पहिली प्रतिक्रिया, पवारांच्या मुंबईतल्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
sharad pawar: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन (ST Andolan) केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेचेही धाबे दणादणले.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन (ST Andolan) केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेचेही धाबे दणादणले. या आंदोलनात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करतानाच चप्पल भिरकावण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व उपाय केले आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. तरीही कोणती तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवण्याचं, बिघडवण्याचं काम करत आहे. एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, डोके भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी (sanjay raut) कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र भाजपकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झाल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडीचं राज्य डोळ्यात खुपसंतय, पोटात दुखतंय असे लोक हे कृत्य करत आहेत. पवार संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत. आंदोलनं, मोर्चे हा लोकांचा हक्क आहे असं मानणारे ते आहेत. ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाला सुप्रिया सुळे निर्भयपणे सामोरे गेल्या. आंदोलकांशी चर्चा करत होत्या, हात जोडून विनंती करत होत्या. समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन होतं हे लोकशाहीला शोभणारं नाही. या लोकांचे नेते कोण आहेत हे पाहावं लागेल. त्यांचे संस्कार काय आहेत हे पाहावे लागेल, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
आम्हीही दगड मारले पण…
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या आंदोलनाला मान्यता आणि स्थान असता कामा नये. आम्हीही आंदोलने केली. लाखोच्या संख्यने आंदोलने केली. दगडफेकही केली. पण कोणत्याही प्रमुख नेत्याच्या घरावर दगडफेक केली नाही. मी जे चित्रं पाहिलं ते अत्यंत दुर्देवी आहे. पवार कुटुंब सुरक्षेचा बडेजाव करत नाहीत. पोलिसांची सुरक्षा कमी पडलीय का? संदर्भात मी विचारणं बरोबर नाही. गृहमंत्री अधिकाऱ्यांना विचारू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांतदादांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का?
2014 ते 2019मध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची निर्मिती करण्याचे तीनदा प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी डिटेक्टीव्ह एजन्सी काढलेली दिसते. चांगलं आहे. मदत लागली तर घेऊ, असा टोला राऊत यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
ST Strike: ‘माझे आईवडील, मुलगी आतमध्ये आहेत, प्लीज…’ एसटी कर्मचाऱ्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव
Nana Patole: विजेचे संकट ते तपास यंत्रणांचा गैरवापर; पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?