‘…तर धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई होईल, सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही’, मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्ट वक्तव्य
संजय शिरसाट यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मोफत भोजनाबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांची पाठराखण केली आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या मागे, पुढे, पडद्यामागे आणखी कुठे जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं आहे. त्याप्रमाणे कारवाई सुरु झाली आहे. यात कोणीही असला, कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर कारवाई होईल. यदा कदाचित धनंजय मुंडे यांचं नाव आलं तर त्यांच्यावरही कार्यवाही केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांच्याकडून सुजय विखे पाटील यांची पाठराखण
संजय शिरसाट यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याचीही पाठराखण केली आहे. सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी केली आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यानंतर ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंजय सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याची पाठराखण केली.
“भिकारी मुक्त देवस्थान आणि मोफत भोजन बंद या सुजय विखेंच्या वक्तव्याचा मी आज शिर्डी दौऱ्यावर असतांना पूर्ण अर्थ समजून घेतला आहे. काल मला पूर्ण वस्तुस्थिती माहीत नव्हती तर मी त्यांच्या वक्तव्यास विरोध केला होता. मात्र आज मी त्याबाबत व्यवस्थित माहिती घेतली. सुजय विखे यांचा भक्तांचा कोणताही अनादर करण्याचा उद्देश नव्हता. शिर्डीत बसने किंवा ट्रकने माणसे येतात. व्हाईटनर पित नशा करणारे येतात. त्यांना पायबंद घालावा हा त्यांचा उद्देश त्या वक्तव्यामागे होता. साईभक्तांचा अनादर करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे आता या वादावर पडदा पडावा, असं मला वाटतंय”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“शिर्डी देवस्थानच प्रसादालय आहे. ते तसेच सुरु राहील आणि तिथे कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. “विरोधक काय बोलतात याला महत्त्व नाही. वस्तुस्थिती काय असते हे समजलं पाहीजे. सुजय विखेंनी मला वस्तुस्थिती सांगितली. विरोधाला विरोध करायचा नसतो. भूमिका समजून घेणं गरजेचं आहे”, असंही संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावर टीका
संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संपूर्ण महाराष्ट्राने सकाळचा वाजणारा भोंगा पाहीला आहे. भोंग्याने उबाठा गटाची वाट लागलीय. त्या भोंग्याला आता सद्बुद्धी आलेली आहे. मधल्या काळात त्याने कोणते औषध उपचार केले माहीत नाही. आता त्यांची भाषा मवाळ, लोकांच्या चरणी लिन होण्यासारखी आहे. त्यांना दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी उत्सुकता लागली आहे. त्या प्रकारची भाषा आता त्यांची झालीय. एकेकाळी ह्याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे आता त्यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात, हा त्याच्यात झालेला बदल त्यांच्यासाठी भरपूर आहे”, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.