राज- उद्धव ठाकरे एकत्र आल्यास पेढे वाटू, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान; असं का म्हणाले?
राज्यात नवीन समीकरणे होताना दिसत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनीही एकत्र येण्यास अनुकूलता दर्शवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चाही रंगली आहे. या मुद्द्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम करण्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येतील अशी चर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला बसण्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू असल्याचं दिसून येतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यावर शिंदे चिडले होते. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याचं अधोरेखित झालेलं आहे. आता यात शिंदे गटाच्या बड्या मंत्र्याने उडी घेतली असून मोठं विधान केलं आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास तुम्हाला धोका आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर शिरसाट यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तर आम्ही पेढे वाटू, असं संजय शिरसाट उपरोधिकपणे म्हणाले. तसेच आम्हाला कोणताही धोका नाही. आमच्या सत्तेला कुठेही धक्का लागणार नाही, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
ही चांडाळ चौकडी…
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची हाक दिली. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे यांचा काय संदेश आहे हे कळते. याची जाणीव आहे. आम्ही आजही नाते टिकविले आहे. आम्ही संदेश न समजायला दूधखुळे नाहीत. तुम्ही युती करा. आत्महत्या करण्याची वेळ कुणावर आली हे कळेल. हे चांडाळ चौकडी लोक कधीच युती होऊ देणार नाही. युती झाल्यास अस्तित्व संपेल ही भीती आहे, असं शिरसाट म्हणाले.
लाचारीची सवय तुम्हाला
राज ठाकरे यांना कुणाचाही सपोर्ट नसताना त्यांनी पक्ष मोठा केला आणि सांभाळला. सत्तेसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरणारे लाचार तुम्ही. लाचारांची फौज तयार झाली असल्याने पक्षाची ही अवस्था झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत रहा, ते तुम्हाला लाथा मारतील. राज्याचा हिताचे दोन निर्णय सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुम्हाला पश्चात्ताप झाला, असा दावाही त्यांनी केला.
तेव्हा लागलेली आग…
खासदार संजय राऊत यांनी एक कार्टून ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांचे कार्टून पाहिल्यावर तुम्हाला हसायला येईल आणि आम्ही केलेल्या उठावामुळे त्यांच्या मागे लागलेली आग दाखवत आहे. ते त्यांचं कार्टून आहे की त्यांच्या नेत्याचं आहे माहीत नाही. मात्र तेव्हा लागलेली आग आज पण आहे. द्विधा मनस्थितीत तर ते आज ही आहेत. पिछेहाट नाही आणि पूर्णविराम नाही.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. ते भविष्यात एकत्र येण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. एकदा एकत्र येऊ द्या, त्यांना जाहीर करू द्या. अंदाज बांधणे चुकीचे आहे. टीका करणारा रोहित पवार रोज अजित पवार यांच्या पाया पडतो. संजय राऊत यांना मुजरा घालायची सवय लागली आहे, असे हल्लेच त्यानी केले.