फरार कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांचा पोलीस यंत्रणेस प्रश्न?
Santosh Deshmukh murder case: पोलीस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे की त्या आरोपीचे काय झाले आहे. आम्हाला देखील कृष्णा आंधळेच स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे तो का सापडत नाही, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 100 दिवस झाले आहे. या शंभर दिवसांत देशमुख कुटुंबाला न्यायासाठी मोठा लढा उभारावा लागला. त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. त्यानंतर आरोपींना अटक होणे, आरोपपत्र दाखल होणे या हालचाली घडल्या. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना खेद व्यक्त केला.
धनंजय देशमुख म्हणाले, प्रत्येक आरोपींने चुकीच्या पद्धतीने हे हत्यासत्र घडवले. त्यामुळे न्यायाच्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलो. मनोज जरांगे पाटील, लोकप्रतिनिधी आणि समाजाचे सर्व घटक एकत्र आले. त्यानंतर कुठे गुन्हा दाखल झाला. आता आरोपींना फाशीची शिक्षा कधी होईल, हे येणाऱ्या काळात बघावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
तो दिवस न्यायाचा असणार
संतोष देशमुख यांच्या हत्येचा शंभर दिवसांचा प्रवास खूप खडतर होता, असे सांगत धनंजय देशमुख म्हणाले, या काळात आम्हाला खूप मोठा त्रास झाला. कुटुंबात बसून दुःख व्यक्त करायला आम्हाला वेळ मिळाला नाही. न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या काळात सगळ्या जाती-धर्माच्या लोकांनी साथ दिली. अन्यथा आमच्या अडचणी वाढल्या असत्या. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल तो दिवस न्यायाचा असणार आहे.




कृष्णा आंधळे याबाबत उत्तर दिले पाहिजे
कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, पोलीस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे की त्या आरोपीचे काय झाले आहे. आम्हाला देखील कृष्णा आंधळेच स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे तो का सापडत नाही, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करून फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. शंभर दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे. या काळात एखादा आरोपी न सापडणे गंभीर प्रकार आहे. आता याबाबत काही भूमिका घ्यायची गरज पडली तर गावाच्या विचाराने घेऊ, असे धनंजय देशमुख म्हणाले.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाल्या, एका गोष्टीची खंत वाटते एक आरोपी अजून ताब्यात आला नाही. आज पूर्ण महाराष्ट्र एकच ध्यास लावून त्याला कधी अटक होणार? हे शंभर दिवस आमच्यासाठी खूप दुःखद होते. ते दुःख विसरून आम्ही आमच्या वडिलांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो.