सरदार पटेलांचा पुतळा तीन वर्षात उभा राहतो, मग आंबेडकर स्मारकाला उशीर का?; आनंदराज आंबेडकर यांचा सवाल
इंदू मिल येथील जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाला उभारण्यासाठी प्रचंड उशीर होत आहे. यावरून बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरले आहे. या संदर्भात समिती नेमून कामावर देखरेख ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 6 डिसेंबर 2023 : वर्षभरात इंदू मिल येथील जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पूर्ण होईल असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणत असले तरी या स्मारकाला विलंब होत आहे. स्मारकाचे काम अतिशय संथगतीने होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार पटेल याचं स्मारक तीन वर्षांत उभे करू शकतात, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब का ? असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. या स्मारकाला आणखी काही वर्षे लागतील असे एमएमआरडीएने म्हटले आहे. या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना विचारले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला प्रचंड विलंब होत आहे. जर सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक तीन वर्षांत पूर्ण होत असेल तर इंदू मिलच्या स्मारकाच्या कामाला का उशीर होत आहे असाही सवाल आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. इच्छा शक्ती असेल तर सर्व काही होते, आपण माहीती घेतली, त्यानूसार पुतळा बनवायला अजून दोन अडीच वर्षे लागतील असे म्हटले जात आहे. माझं तर सरळ म्हणणं आहे की एक कमिटी नेमावी आणि कामाची देखरेख करण्याचा अधिकार त्यांना द्यावा आणि याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यावेळी म्हणाले.
राजस्थान कोर्टातील मनूचा पूतळा काढावा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुप्रिम कोर्टात उभा राहीला ही आनंदाची बातमी आहे. परंतू इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि स्मारकाला उभारायला मात्र इतकी वर्षे लागत आहे ही दु:खदायक बाब असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सूजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. जसा बाबासाहेबांचा पुतळा सुप्रिम कोर्टात उभा राहीला आहे तशी आम्ही आशा ठेवतो की राजस्थानमधील हायकोर्टातील मनूचा पुतळा लवकर काढून टाकावा अशी मागणीही सूजात आंबेडकर यांनी केली आहे. हिंदू मिलच्या जागेवर पुतळा उभा करण्याचे एक थिंक टॅंक किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट उभी केली असती तर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरले असते असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले.