तर आमच्या गावावर…पंकजा मुंडे यांच्या त्या दाव्यावर धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, मस्साजोगला येण्यास का केला मज्जाव?
Dhananjay Deshmukh reaction on Pankaja Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे या मस्साजोगला गेल्या नाहीत, असा दावा केला होता. त्यावरून आता पुन्हा वातावरण तापलं आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते. तर पंकजा मुंडे यांचे बूथ प्रमुख होते. तरीही पंकजा मुंडे या त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेल्या नाहीत, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता. या मुद्यावरून मुंडे आणि धस यांच्यामध्ये पुन्हा वाकयुद्ध रंगले आहे. या वादावर आता धनंजय देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांचा दावा काय?
संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना समोर आल्यानंतर आपण त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालो होतो. आपल्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी येत असल्याचा फोन सुद्धा केला. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे देशमुख यांनी सांगितल्याने, फोनवरच आपण त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनं केल्याचे मुंडे म्हणाल्या.




धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया काय?
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी धस आणि मुंडे यांच्यावरील वादाच्या मुद्दावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांना मस्साजोगमध्ये येण्यास मज्जाव का केला याविषयी त्यांनी खुलासा केला आहे.
पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येण्यासाठी फोन केला होता परंतु या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आरोपीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे आमच्याकडे नेहमी लक्ष होते. त्यांची आणखीही आमच्यावर नजर आहे. आरोपीचे समर्थन करणार्यांनी जर पंकजा मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक वगैरे केली असती तर त्याला जिम्मेदार मला धरण्यात झालं असतं आणि परत या प्रकरणाला जातीय रंग निर्माण व्हायला वेळ लागला नसता म्हणून मी पंकजा मुंडे यांना गावात न येण्यास सांगितल्याचे देशमुख म्हणाले.
आरोपींचे समर्थक मस्साजोगमध्ये
या प्रकरणातील आरोपीला पकडून ज्यावेळी केज न्यायालयात आणले त्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. त्यामध्ये सुध्दा काही लोक जे गुंड प्रवृत्तीचे होते आरोपीचे समर्थक होते. ती गोष्ट जर मसाजोग इथे घडली असती तर जिम्मेदारी माझ्यावर आली असती. आरोपीचे समर्थक दहा दिवसानंतर ही मसाजोग मध्ये येऊन काय चाललंय हे लक्ष ठेवत होते, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
हा विषय आता माझ्यावर आणि कुटुंबापुरता मर्यादित नाही. सगळ्यांचा विषय झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे जर आता यायचे असतील तर मला सगळ्यांना विचारावा लागेल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.