Abhijit Bichukale | महायुतीला जागा वाटपाचा तिढा सोडवायचा असेल, तर….अभिजीत बिचुकलेने काय सांगितलं?
अभिजीत बिचुकले हे त्यांची राजकीय मत मांडतात, स्वत:च्या राजकीय महत्वकांक्षा व्यक्त करतात, तेव्हा त्या अशक्य गोष्टी असतात. त्यातून विनोद निर्मितीच होते. आता सुद्धा अभिजीत बिचुकले यांनी असेच दावे केले आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतात. आता लोकसभा निवडणुकीचा हंगाम आहे. सर्वच राजकीय पक्ष जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीमध्ये व्यस्त आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुती आणि मविआमध्ये अद्यापपर्यंत आपसातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. काही जागांवर मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागतोय. या दरम्यान अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे वाट्टेल ते दावे केले आहेत. अभिजीत बिचुकले हे त्यांची राजकीय मत मांडतात, स्वत:च्या राजकीय महत्वकांक्षा व्यक्त करतात, तेव्हा त्या अशक्य गोष्टी असतात. त्यातून विनोद निर्मितीच होते. आता सुद्धा अभिजीत बिचुकले यांनी असेच दावे केले आहेत.
“सातारा लोकसभेची निवडणूक मी लढणार. अभिजीत बिचुकले सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार. उदयन राजे यांना दुसऱ्या पक्षात जायची काय गरज?. त्यांना दिल्लीत जावं लागत हे दुर्देवी” असं अभिजीत बिचुकले म्हणाला. “ज्या भाजपवाल्यानी जय भवानी, जय शिवाजीला विरोध केला त्या भाजप सोबत उदयन राजे का गेले ?” असा सवाल अभिजीत बिचुकले यांनी विचारला. “महायुतीच्याया नेत्यांनी जागा वाटपासाठी माझ्याकडे यावं मी तिढा सोडवतो” असा दावा त्यांनी केला.
उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत हे मला पटत नाही
“अजित पवारांना केवळ 2-3 जागा मिळतात. अमित शाह गुजराती उद्योजक आहेत, सगळे त्यांचे चाकर झाले आहेत. उदयनराजे माझे बंधू होते, आहेत आणि राहणार. मी अनेक निवडणुका त्यांच्या विरोधात लढल्या. पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत. छत्रपती हे छत्रपती आहेत, ते इकडे तिकडे फिरताहेत हे मला पटत नाही. राज्याला नवी दशा आणि दिशा मी देणार” असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला.