त्याचं पाप नरेंद्र मोदी यांना लागेल… बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले असं का म्हणाले?
आजकालची पिढी ही आमच्या लाईफस्टाइलला बदनाम करणारी आहे. कुठेही जायचं आणि कुणालाही शिव्या द्यायच्या हे प्रभू रामचंद्रांनी शिकवलेलं नाही. आदर्श घ्यायचा असेल तर अभिजीत बिचुकले यांचा घ्या, असं सांगतानाच अयोध्येतील कार्यक्रमाला मला कुठं तरी राजकीय रंग असल्याचे दिसत आहे. मात्र मला या राजकारणाचं काही घेणेदेणे नाही. माझे प्रभू रामचंद्र जर येत असतील, तर मी कायमच प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी तयार आहे, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
संतोष नलावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सातारा | 21 जानेवारी 2023 : राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभर जल्लोष करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साताऱ्यातही पोवई नाक्यावर अभिजीत बिचुकले यांनी भला मोठा बॅनर लावला आहे. या बॅनरवर प्रभू रामचंद्रांच्या पायाजवळ हात जोडून बसलेला बिचुकले यांचा फोटो आहे. हा भला मोठा बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले यांनी मीडियाशी संवाद साधला. श्रीराम हे कुठल्या एका जातीचे नाहीत. कुठल्या धर्म, पंथाचे नाहीत तर प्रभू रामचंद्र हा एक विचार आहे. मी त्यांचा भक्त आहे. हेच मला यातून दाखवून द्यायचं आहे. म्हणूनच मी पोवई नाक्यावर हा बॅनर लावला आहे, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.
मोदींना काय सूचवायचंय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मोठा फॅन आहे. पण मला मोदींची एक गोष्ट खटकली. त्यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रभू राम हे मोदींचं बोट पकडून जाताना दिसत आहेत. राम हे छोटे दाखवले आहेत. तर मोदी हे मोठे दाखवले आहेत. त्यातून मोदींना काय सूचवायचं आहे? असा सवाल बिचुकले यांनी केला.
संविधानातही प्रभू राम
मी सर्वांना झुकवू शकतो. मात्र मी माझ्या आई-वडिलांसमोर आणि प्रभू श्री रामासमोर झुकतो. कारण मी त्यांना ईश्वर मानतो.संविधानात देखील प्रभू रामचंद्राचा फोटो आहे. जे काही दिलं ते सर्वांना संविधानाने दिलं. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत, असं ते म्हणाले.
मोदींना पाप लागेल
प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र हा उत्सव रामनवमीच्या दिवशी का घेतला नाही? असा माझा प्रश्न आहे. मी प्रसारमाध्यमातून ऐकतोय की अजूनही या मंदिराचं काम सुरू आहे. अर्धवट मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असेल तर याचं पाप नरेंद्र मोदी यांना लागेल, असंही ते म्हणाले.
हिंदू हा धर्म नसू तो…
मी राम भक्त आहे देशाला मानतो. याचं पुण्य मला नक्की मिळेल. हिंदू हा धर्म नसून स्टाईल ऑफ लिविंग लाइफ आहे. सर्व राजकीय नेत्यांना माझा प्रश्न आहे. कुणी डोक्याला टिळक लावून फिरता का? मी 1991 सालापासून डोक्याला टिळक लावून फिरतो. मी हिंदू पद्धतीने जगतो. ती जीवनाची पद्धत आहे, धर्म नाही. भगव्याचा अर्थ दुसऱ्यांना शिव्या घालणे नाही. भगव्याचा खरा अर्थ आहे गौतम बुद्धांनी सांगितला. भगवा घाला, त्याग करा आणि दुनियेला चांगल्या मार्गावर आणा, असा भगव्याचा अर्थ आहे, असंही ते म्हणाले.