साताऱ्याच्या पुसेसावळी गावात दोन गट आमनेसामने, एकाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
साताऱ्याच्या पुसेसावळी गावात काल दोन गटात संघर्ष झाला. या संघर्षात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांकडून संपूर्ण काळजी घेतली जात आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
सातारा | 11 सप्टेंबर 2023 : साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी या गावात दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना काल रात्री (रविवारी रात्री) घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरातील इंटरनेट सुविधा देखील पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात हिंसा भडकू नये यासाठी पोलिसांकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे. पण काल झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी पुसेसावळी गावात दोन गटामध्ये संघर्ष निर्माण झाला. हा संघर्ष इतका टोकाला पोहोचला की दोन गट आमनेसामने आले. दरम्यान, काल रात्री घडलेल्या प्रकारानंतर पुसेसावळी गावात आज तणावपूर्ण शांतता आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आलंय.
वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून
पुसेसावळी गावाच्या मुख्य चौकात पोलीस दलाबरोबरच अग्निशामक दलाची गाडी देखील ठेवण्यात आली आहे. पुसेसावळी गावाकडे येणारे रस्ते देखील बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. गावातील सर्व व्यवहार आज बंद असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गावात तळ ठोकून आहेत. कोणत्याही प्रकारची विपरीत घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
500 हून अधिकचा जमाव मार्केटमध्ये आला आणि…
या दरम्यान काल रात्री झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं, तसेच भाजी मार्केटमधील दुकानांचं नुकसान झालंय. रात्री आठच्या सुमारास 500 हून अधिकचा जमाव भाजी मार्केटकडे आला. या जमावातील काहींनी भाजी मार्केटमधील दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिलं. तसेच कांदा, बटाटा ठेवण्यासाठीचे क्रेट देखील फोडून टाकले आहेत. काल रात्री घडलेल्या प्रकारानंतर आजही या भाजी मार्केटमधील साहित्य विस्कटून पडलेल्या अवस्थेतच पाहायला मिळतंय.
100 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल
सातारा पोलिसांनी याप्रकरणी नेमकी काय कारवाई केली याविषयी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपींविरोधात कलम 295 आणि 34 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या वादग्रस्त पोस्टवरुन हिंसा भडकली ती पोस्ट पोलिसांनी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवली आहे. पोलिसांनी संबंधित परिसरात कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, गावातील परिस्थिती आता निवळली असल्याचा दावा गावकऱ्यांचा आहे.