Prithviraj Patil : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पृथ्वीराज पाटीलचा कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार, आमदार शिवेंद्रराजेंकडून कौतुक
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पृथ्वीराज पाटीलचा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार केला. यावेळी त्यांनी पृथ्वीराज पाटील याच्या कामगिरीचं कौतुक केलंय.
सातारा : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesri 2022) थरार हा साताऱ्यात रंगला होता. या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने (Prithviraj Patil) मैदान मारलं आहे. सोलापूरच्या विशाल बनकरला (Vishal Bankar) त्याने अंतिम लढतीत आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा जिंकली आहे. आणि कोल्हापूरचा जणू 21 वर्षाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा वनवास संपवला आहे. त्यामुळे सध्या पृथ्वीराज पाटील हा कुस्तीगिरांच्या आणि महाराष्ट्राच्या मनावर राज्य गाजवतोय. पृथ्वीराजच्या या कामगिरीबद्दल जिल्हामध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बाबाराजे जावली केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील याला आमदार शिवेंद्रराजे यांनी 5 लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी सातारा कंदी पेढ्याचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलत असताना पृथ्वीराज पाटील यांने म्हटलंय की, ‘मदत करणं हे छत्रपतींच्या रक्तातच आहे आणि मला केलेल्या या मदतीचं मी सोनं करेन आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीनच, असा विश्वासही पृथ्वीराज याने व्यक्त केलाय.
कोण आहे पृथ्वीराज पाटील?
- मूळ गाव-कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे हे पृथ्वीराजचं मूळ गाव आहे.
- शिक्षण- पृथ्वीराज पाटील याने बारावीपर्यंत शिक्षण हे संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे.
- तालिम-त्याने कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात केली आहे.
- वस्ताद- वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटील अशा तगड्या कुस्तीगिरांकडून त्याला कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले आहे.
- वजन- त्याचे सध्याचे वजन 95 किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- सैन्यात कार्यरत- तो आर्मीत हवालदार पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
- कास्य पदकाचीही कमाई- पृथ्वीराज पाटीलने याआधीही मोठं यश संपदान केलं आहे. त्याने ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत त्याने कास्य पदकाचीही कमाई केली आहे.
- विशाल बनकरवर मात- यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे.
- सोलापूर विरुद्ध कोल्हापूर -मूळचा सोलापूरचा विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती.
- 21 वर्षांची प्रतीक्षा संपवली- 21 वर्षानंतर कोल्हापूरला मानाची महाराष्ट्र केसरीची गदा मिळवूण देण्यात त्याला यश आले आहे.
इतर बातम्या
Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं
Devmanus 2: ‘देवमाणूस २’ मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा; सेटवर जल्लोष