अडीच वर्षांची चिमुकली, पत्नी, आई-वडील; शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांचा सुन्न करणारा आक्रोश
जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे झालेल्या अपघातात साताऱ्यातील कामेरी येथील जवान शुभम घाडगे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज कामेरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कौटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण गावही शोकाकूल झालं.
जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात साताऱ्यातील कामेरी येथील जवान शुभम घाडगे हे शहीद झाले. त्यांची 11 मराठी रेजिमेंटमध्ये नियुक्ती होती. त्यांचे पार्थिव आज कामेरी गावात दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शुभम हे 28 वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात अडीच वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव साहिशा आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी असून त्यांचा लहान भाऊ संजय घाडगे हा देखील सैन्यदलात कार्यरत आहे.
शहीद शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी अंतदर्शनसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी गावातून शहीद शुभम घाडगे ‘अमर रहे’च्या घोषणा देत अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थांनी उभे राहून फुले वाहत शुभम घाडगे यांना श्रद्धांजली वाहिली. सातारा पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या वतीने शहीद जवान शुभम घाडगे यांना बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी छोटे बंधू संजय घाडगे यांच्या हस्ते शहीद शुभम गाडगे यांना मुखाग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीमेवर भारतीय सैन्य उभं आहे म्हणून देशात आपण खूप मोकळ्या हवेत श्वास घेतोय. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर इतकी बर्फवृष्टी होते तरीदेखील भारतीय सैन्याचे जवान तिथे जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात. देशभक्ती काय असते हे त्या जवानांकडे पाहिल्यानंतर समजतं. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवादी आंदोलकांकडून होणारे हल्ले, दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले आणि तिथली भौगोलिक स्थिती या सर्वांचा सामना करत भारतीय सैन्य तिथे 24 तास संरक्षण करत असते. अशा शेकडो संकटांना सामोरं जात असताना काही वेळेला अपघाताच्या घटना घडतात आणि त्या अपघाताच्या घटनांमध्ये भारतीय सैन्याच्या जवानांचा मृत्यू होण्याच्या घटना देखील घडतात. पण या घटनेमुळे देशाची मोठी हानी होते. जे जवान देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जातात त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आधार हरवून जातो.
साताऱ्याचे जवान शुभम घाडगे यांची मुलगी तर अवघ्या अडीच वर्षांची आहे. या घटनेमुळे एका चिमुकलीच्या वडिलांचं छत्र हरपलं आहे. महिलेने पतीला गमावलं आहे आणि आई-वडिलांनी तरुण मुलाला गमावलं आहे. त्यामुळे त्यांचा आक्रोश हा सुन्न करणारा, काळीज पिळवटून टाकणारा आहे. त्यांच्या आक्रोशाने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. संपूर्ण सातारा जिल्हा या घटनेमुळे हादरला आहे.