मंत्री शंभूराज देसाई यांच्या कुटुंबातली आनंदाची बातमी, यशराज देसाई यांच्या लग्नाचा जानेवारीत धुमधडाका
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या कुटुंबातील आनंदाची बातमी समोर आली आहे. शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांचा विवाह ठरला आहे.
सातारा | 3 नोव्हेंबर 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या कुटुंबातील आनंदाची बातमी समोर आली आहे. शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांचा विवाह ठरला आहे. यशराज देसाई यांचं एम. टेकपर्यंतचं शिक्षण झालंय. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी यशराज देसाई यांच्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून आता त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यशराज देसाई यांचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे.
यशराज देसाई यांचा विवाह इंद्रजीत निंबाळकर यांच्या कन्या वैष्णवी निंबाळकर यांच्यासोबत ठरल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवी निंबाळकर यांचं एमबीबीएसचं शिक्षण झालंय. त्या डॉक्टर आहेत. शंभूराज देसाई यांचे वडील आणि यशराज देसाई यांचे आजोबा दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई हे खूप बडे प्रस्थ होते. राज्यात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. ते राज्याचे शिक्षणमंत्री, गृहमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रीदेखील होते. तसेच शंभूराज देसाई महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते.
शंभूराज देसाई सध्या राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहेत. अशा राजघराण्यात डॉक्टर वैष्णवी निंबाळकर यांचा जानेवारी महिन्यात सून आणि गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश होणार आहे. यशराज यांच्या विवाह निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. यशराज देसाई आणि डॉ. वैष्णवी निंबाळकर यांचा विवाह 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पाटणच्या दौलत नगर येथील कसबे मरळी येथे हा विवाह पार पडणार आहे.