मोठी बातमी! बड्या नेत्यानं एकनाथ शिंदेंची साथ सोडली, उद्धव ठाकरेंचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. ठाकरे यांनी शिवबंधन बांधून घोलप यांचं शिवसेना ठाकरे गटात स्वागत केलं.
बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. उमेदवाराची घोषणा होताच पुन्हा एकदा बबनराव घोलप हे देखील स्वगृही परतले आहेत. वडील बबनराव घोलप यांनी जरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी देखील योगेश घोलप मात्र शिवसेना ठाकरे गटात होते. त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यानंतर बबनराव घोलप यांनी देखील पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
बंडखोरी रोखण्याच आव्हान
दरम्यान आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जवळपास जागा वाटप निश्चित झालं आहे, उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. मात्र जे नेते इच्छुक असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही असे अनेक जण आता बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं दिसून येत आहे. या बंडखोरीचा मोठा फटका हा त्या-त्या मतदारसंघात संबंधित पक्षाला बसू शकतो. त्यामुळे आता पक्षांतर्गत होणारी बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान हे सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आहे.