रामनवमीच्या मिरवणुकीवरून शहाद्यात कडकडीत बंद; शहरात मोठा फौजफाटा दाखल
रामनवमीच्या मिरवणुकीत आडकाठी आणली म्हणत आज शहाद्यात कडकडीत बंद पाळण्यात येतोय. या आंदोलनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी हाक दिलीय. सकाळपासूनच सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद आहेत. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालाय. सध्या तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने मोर्चासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होत आहेत.

नंदुरबारः शहादा (Shahada) येथे रविवारी निघालेल्या रामनवमीच्या (Ramnavami) मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने आठमुठी भूमिका घेतल्याचा आरोप करत आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय. या आंदोलनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी हाक दिलीय. सकाळपासूनच शहादामधील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद आहेत. शहरात पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा दाखल झालाय. शहरातील तरुण आणि नागरिक टोळक्याटोळक्याने मोर्चासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होत आहेत. रामनवमीच्या मिरवणुकीपूर्वी काल पोलिसांनी बँड पथकाला ताब्यात घेतले होते. तसेच त्यांची उशिरा सुटका केली होती. त्यामुळे मिरवणुकीला वेळ मिळाला नाही. हे कारण सांगत मिरवणूक रद्द करण्यात आली. आयोजकांसह रामभक्तांनी मिरवणूक रद्द करून तीन तासांहून अधिक काळ हनुमान चालिसेचे पठण केले. त्यामुळे कालचा दिवस शांततेत गेला. मात्र, आज सकाळपासूनच आंदोलनाने जोर धरला आहे.
बँड पथकाला का थांबवले?
शहाद्यामध्ये कलम 144 (2) लागू आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांनी बँड पथक ताब्यात घेतले आणि मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवायला परवानगी दिली. मात्र, रामभक्त डीजेसह इतर बाबींवर अडून राहिले. प्रशासनाने मिरवणूक थांबवू नका असे सांगितले नाही की, मिरवणुकीवर कारवाईही केली नाही. फक्त कायदा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
तर कारवाई होणार
सध्या शहरात तरुणांनी अनेक ठिकाणी घोषणाबाजी सुरू केलीय. दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, याविरोधात व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्रास झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे केल्या, तर नियमानुसार कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी दिलाय. दुसरीकडे काल रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दीडशेपेक्षा अधिक नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आलीय.