संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावे – शहाजीबापू पाटील यांची खोचक टिपण्णी
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला असून त्यानंतर शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. यानंतर शिवसेनेचे आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवली, असे शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
आता संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावे आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे असा खोचक टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे. त्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये निकालावर अधिक विश्लेषण करू. मात्र सध्या मला एवढंच सांगायचं आहे की, जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.