अमरावतीत पवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल, पुतिन यांच्याशी केली मोदींची तुलना
अमरावतीत यंदा तिहेरी लढत होत आहे. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बळवंत वानखेडे यांच्यासाठी अमरावतीत सभा घेतली. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी केलीये.
अमरावती : अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखडेंसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवारांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. 2019 मध्ये नवनीत राणांना खासदार करुन चूक झाली अशी चूक पुन्हा करणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. अमरावतीतून शरद पवारांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला..2019 मध्ये नवनीत राणांसाठी जागा सोडून त्यांना खासदार केलं, ही आपली चूक झाली. यापुढं चूक होणार नाही, असं सांगून शरद पवारांनी काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना मतदान करा, असं आवाहन केलंय.
नवनीत राणा यांच्यावर निशाणा
2019 ला नवनीत राणा अपक्ष लढल्या. आघाडीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सुटली होती आणि शरद पवारांनी इथं उमेदवार न देता, नवनीत राणांना पाठिंबा दिला होता. मात्र विजयानंतर नवनीत राणांचा कल भाजपच्या बाजूनं गेला. आणि आता तर त्या भाजपच्याच उमेदवार आहेत. शरद पवारांनी अमरावतीकरांना चूक सुधारण्याचं आवाहन केलं, तर उद्धव ठाकरेंनी थापाड्यांची लंका जाळण्यासाठी आल्याचं सांगत नवनीत राणांना आव्हान दिलं.
अमरावतीत तिहेरी लढत
भाजपच्या नवनीत राणांचा सामना, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारच्या दिनेश बूब यांच्याशी आहे. वानखडेंसाठी ठाकरे आणि पवारही मैदानात उतरले आहेत. पवारांनी आपल्या भाषणातून राणांसह पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पवारांनी मोदींची तुलना रशियाचे हुकूमशाह पुतीन यांच्याशी केली.
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी देशभरात जोरदार प्रचार सुरु आहे आणि पंतप्रधान मोदींनी राजस्थानातल्या सभेतून मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देवून नवा वाद निर्माण झालाय. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असून अधिक मुलं असणाऱ्यांना काँग्रेस संपत्ती वाटून देईल, असं मोदी म्हणाले आहेत.
मोदींनी 18 वर्षांआधीचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्य चर्चेत आणलं. 2006 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेत मनमोहन सिंग यांनी मुस्लिमांसह एससी आणि एसटी समाजाचा उल्लेख केलेला होता. आता मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर घाबरलेत. त्यामुळं मनमोहन सिंहांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ काढून प्रक्षोभक भाषण देत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.