शरद पवारांचा मविआत नवा बॉम्ब, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, ठाकरे काय भूमिका घेणार?
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर शरद पवारांनी आज उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा, अशी उद्धव ठाकरे यांची आग्रही भूमिका आहे. पण शरद पवारांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत मागणी आहे. महाविकास आघाडीत शरद पवार यांचा पक्ष कालपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही नव्हता. कारण शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याआधीच त्याबाबतचं मत मांडलं होतं. पण काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करुन महाविकास आघाडीत नवा बॉम्ब टाकला आहे. “निडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो”, असं शरद पवार म्हणाले आहेत. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा, असं आवश्यक नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आता काहीच कारण नाही. निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा विचार, अजून कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल यात शंका नाही, पण आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. 1977 साली आणीबाणीनंतर निवडणूक झाली. तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं नव्हतं. मतं मागताना मोरारजी देसाई यांचं नाव नव्हतं. पण निकालानंतर त्यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे, असा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तीनही पक्ष एकत्र बसू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ”, असं शरद पवार म्हणाले.
नाना पटोले यांचा शरद पवारांच्या मताला पाठिंबा
शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार काही चुकीचं बोलले नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. संख्याबळ पाहूनच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल”, असं नाना पटोले म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “याबाबत अंतर्गत चर्चा होईल. मुख्य गोष्ट हीच आहे की कुणी मुख्यमंत्रीपदासाठी लढत नाहीय. आम्हाला सरकार यासाठी बनवायचं आहे कारण भाजप महाराष्ट्र द्वेष्टी आहे. त्यांना हद्दपार करायचं आहे. जागा वाटपाच्या वेळी रस्सीखेच होणार. ते व्हायलाच पाहिजे. नाही झाली तर कुणाची ताकदच नाही. प्रत्येक जागा प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच 288 जागांवर सर्वांना मदत करु शकतो. त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.