शरद पवार सोबत असताना अमोल कोल्हे यांनी थेट कार्यकर्त्याला केला व्हिडीओ कॉल, असा झाला संवाद Watch Video
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाचे प्रमुख नेते आमदार, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपा शिवसेनेसोबत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे पक्षात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट तयार झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत आमदारांची मोठी फौज असल्याचं समोर आलं आहे. तर शरद पवारही अजित पवार यांच्या बंडाविरोधात मैदानात उतरले आहे. शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. असाच एक संवाद राज्याच्या दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यासोबत केला. त्याची व्हिडीओ क्लिप खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
शरद पवार यांनी कसा साधला संवाद
अमोल कोल्हे यांनी ट्विटर व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत उर्जा देणारी आहे. तसेच कार्यकर्त्यांचा विश्वास शरद पवार यांच्यावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नाशिक येथून सुरुवात केली आहे.
हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर.. “ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची!आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे.#लढायचंय_जिंकायचय… pic.twitter.com/2lHGMiRqnf
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2023
शरद पवार आणि कार्यकर्त्याचा संवाद
- कार्यकर्ता : हॅलो पवारसाहेब नमस्कार
- शरद पवार : नमस्कार, काय चाललंय तालुक्यात
- कार्यकर्ता : आम्ही आहोत तुमच्या पाठिमागे, घाबरू नका. कायम
- शरद पवार : कायम. आपण अनेक वर्षे एकत्र आहोत आणि एकत्र राहू.
- कार्यकर्ता : आमची अनिता होती ना शिकायला बारामतीला. चांगलं शिक्षण झालं. सभापती केली. आता चांगल्या नोकरीला लागली.
- कार्यकर्ता : नमस्कार, तब्येत ठिक आहे ना
- शरद पवार : एकदम ठिक
- कार्यकर्ता : तुमच्यासोबत आहोत आम्ही
अजित पवार यांनी वरिष्ठ नेत्यांसह पक्ष आणि चिन्हावर आपला दावा ठोकला आहे. तसेच निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहारही केला आहे. एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू असलेले छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनीही अजित पवारांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार मैदानात उतरले आहेत. तसेच राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
नाशिक दौऱ्यानंतर शरद पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र हा दौरा पावसाच्या अंदाजावर अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष सामान्य जनतेला पाहायला मिळणार आहे.