विधानसभा निकालावर अखेर शरद पवारांनी मौन सोडलं, पहिली प्रतिक्रिया काय?
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याची उत्सुकता वाढली होती. अखेर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
विधानसभा निकालावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मौन सोडलं आहे. शरद पवार आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे अवघ्या 10 जागांवर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा पक्ष हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो, असा अनेकांचा अंदाज होता. पण निवडणुकीच्या निकालात त्यांचा पक्ष सर्वात लहान पक्ष ठरला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याची उत्सुकता वाढली होती. अखेर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
“आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. मुद्दा तो नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
मविआच्या पराभवाचं कारण काय?
“जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे, लाडक्या बहिणीचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचार हाही करण्यात आला, दोन अडीच महिन्याची रक्कम आता देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं”, असं शरद पवार म्हणाले.
‘ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत ऐकलं, पण…’
“दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात थोडसं आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने या कँपेन करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. “ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात”, असं शरद पवार म्हणाले.