शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, अजित पवार गटातील कोणकोणते आमदार घरवापसी करणार?
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजित दादांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल दिलाय. पक्षाला मदत होईल अशा सहकाऱ्यांना पुन्हा घेण्यास समस्या नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे दादांचे कोणते आमदार शरद पवारांकडे येणार? यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत.
भाजपच्या जेष्ठ नेत्या सूर्याकांता पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून, शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडवणारं वक्तव्य केलं. पक्षाला मदत होईल, अशा सहकाऱ्यांना पुन्हा येण्यास समस्या नाही. पण सरसकट घेणार नाही. त्याबद्दल पक्षातल्या सहकाऱ्यांची चर्चा करुनच निर्णय घेवू, असं शरद पवार म्हणाले आहेत. आता प्रश्न हा आहे की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले किती आणि कोणते आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार? नरहरी झिरवळांनी आपण दादांसोबतच राहणार असल्याचं म्हटलंय. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांत पाटलांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताच अनेकांना परत यायचंय असं वक्तव्य करुन आणखी इनकमिंगचे संकेत दिले आहेत. तर अजित पवारांसोबत आलेले आमदार दादांसोबतच राहणार असून कोणीही कुठे जाणार नाही, असं दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
सरसकट नाही पण कोणाकोणाला घ्यायचं हे ठरवू असं शरद पवार म्हणाले. तर आमदार रोहित पवारांनी याही पुढं जावून सनसनाटी निर्माण करणारा दावा केलाय. अधिवेशनात विकास निधी घेवून अधिवेशन संपल्यावर परत यायचं हा अनेक आमदारांचा प्लॅन असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणं रोहित पवार बातमी सोडतात, असा टोला संजय शिरसाट यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
आतापर्यंत अजित पवारांकडून निलेश लंके शरद पवारांकडे पुन्हा परत आले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट खासदारही झाले. आता अधिवेशन 2 दिवसांत सुरु होणार आहे. अर्थमंत्री अजित पवारच आहेत. त्यामुळे अधिक निधीची आशा दादांच्या आमदारांच्या आहेच. अर्थात निधी घेतल्यावर ते आपल्याचकडे येतील, असं रोहित पवारांना वाटतंय. त्यामुळे अधिवेशन 12 जुलैला संपल्यावर आमदार दादांकडेच राहतात की मग शरद पवारांकडे परततात? हे दिसेलच.