शरद पवारांचा फोटो गायब, अजित पवार म्हणाले, राजकारण कशाला करायचं…
अजित दादा यांच्या निर्णयाने संतप्त झालेल्या शरद पवार यांनी आपले फोटो आणि नाव वापरू नका अशी तंबी अजित पवार गटाला दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांचे नाव आणि फोटो पक्षाच्या पोस्टरवर झळकत होते.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | अजित पवार यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या मेळाव्यातील पोस्टर, बॅनेरवर शरद पवार यांचे फोटो वापरले होते. मात्र, अजित दादा यांच्या निर्णयाने संतप्त झालेल्या शरद पवार यांनी आपले फोटो आणि नाव वापरू नका अशी तंबी अजित पवार गटाला दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांचे नाव आणि फोटो पक्षाच्या पोस्टरवर झळकत होते. मात्र आज एका पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या पोस्टरवरून शरद पवार यांचा फोटो गायब होता. योगेश क्षीरसागर यांच्या कार्यक्रमात अजित दादा गटाने शरद पवारांचा फोटो टाळला.
योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या परिवारातले सगळे डॉक्टर झालेत. असे क्वचित पाहायला मिळतं. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारीही ते पार पाडत आहेत. आम्ही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करतो. त्यात जात पात, धर्म आणि नाते पाहात नाही. जो विश्वास योगेश क्षीरसागर आणि सर्वांनी राष्ट्रवादीवर टाकला आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बीडचे नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.
बीडचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी माझ्याकडे खूप लोक आले, येथे मुस्लिम आणि बहुजन समाज खूप आहे. या शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. येथील नगरपालिका सातत्याने भारत भूषण यांच्यामुळे आम्ही जवळून पाहिली. एकदा रस्ते विकास महामंडळाचे शिल्लक व्याज देण्याचं काम आपण केलं. पैशाचे सोंग आणता येत नाही आणि निधी असल्याशिवाय बेघर माणसाला मदत करता येत नाही असे ते म्हणाले.
राज्यात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी केंद्राशी संपर्क साधला. पंतप्रधान परदेशी निघाले होते. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. पावसाने हूल दिली. थोडीशी काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून धनंजय दिल्लीला गेला त्यावर मार्ग काढला. शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्याचा काम आम्ही करतोय असे त्यांनी सांगितले.
अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून मी आता पाचव्यांचा शपथ घेतली. सुदैवानं माझ्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आहे. त्याचा फायदा चांद्यापासून बांद्यापर्यंत झाला पाहिजे. रोड, फ्लायओव्हर, अमृत योजना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजबिल हे प्रश्न सुटले पाहिजे असे ते म्हणाले.
बीडचा विकास मनापासून विकास करायचा आहे. योगेश क्षीरसागर आज आपल्यासोबत आहेत. मला जुना काळ आठवला. बारामतीकरांनी मला तरुण वयात खासदार केलं. मंत्री केलं. अनेक पदं मला भूषवता आली. मध्यंतरी ज्या राजकीय घटना घडल्या. मला सांगितलं तू राजीनामा दे. त्या घटना का घडल्या ते ५ तारखेला सांगण्याचा प्रयत्न केला. आता त्यावर २७ तारखेलाही बोलणार आहे, असे ते म्हणाले.
बीडमध्ये सर्विस्तर बोलेनच…
कुणी काही वेगळ्या पद्धतीचा प्रचार किंवा दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत. मी मुस्लिम समाजाला सांगतोय की आपण असुरक्षित आहोत अशी भावना कधीही कुणाला जाणवू देणार नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतोय. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्ष झाली. माझा मराठवाडा पुढे यावा अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारण कशाला करायचं?
शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय. कसलंही संकट आलं तर राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, स्थानिक स्वराज्य निवडणुका नसतानाही हे सगळे माझ्यासोबत आहेत. ओबीसी आरक्षणावरून सध्या प्रकरण कोर्टात आहे. समाजकारणात राजकारण कशाला करायचं? हौस म्हणून? की देणं लागतो म्हणून? सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे.. कुठेही यात बदल होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.