शरद पवार यांची ‘या’ 7 जागांसाठी मोर्चेबांधणी, मविआत रस्सीखेच, पडद्यामागे काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांनी पुण्यात साताऱ्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 पैकी 7 जागा पवार गटानं लढवाव्यात अशी मागणी जिल्हा कमिटीनं केलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. देशात नुकतंच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय आणि पराजय लक्षात घेता तेव्हा झालेल्या चुका आता दुरुस्त करण्याचा पूरेपूर प्रयत्न आता प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे. असं असताना महाविकास आघाडीत बिघाडीच्या होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्थात या चर्चांमध्ये किती सत्यता आहे ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांनी पुण्यात साताऱ्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 पैकी 7 जागा पवार गटानं लढवाव्यात अशी मागणी जिल्हा कमिटीनं केलीय. त्यामुळे या सात जागांवर शरद पवार गट खरंच दावा सांगतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील कराड सोडल्यास सातारा, कोरेगाव, मान-खटाव, फलटण, वाई, कराड उत्तर, पाटण हे मतदारसंघ शरद पवार गटाला मिळावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे. 8 विधानसभांपैकी कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत. साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगावात शिंदे गटाचे महेश शिंदे, मान-खटावमध्ये भाजपचे जयकुमार गोरे, फलटणध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण, वाईत मकरंद पाटील, कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील, पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई आमदार आहेत.
जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच?
2019च्या विधानसभेत राष्ट्रवादीनं साताऱ्यात 7 जागा लढवल्या होत्या. दरम्यान त्या सातही जागा मिळाव्यात, अशी मागणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. मात्र, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बसून निर्णय होणार असल्याचं काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधवांनी म्हटलंय. तर 2019मध्ये जिंकलेल्या जागांसह वाढीव जागांची मागणी करणार असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदमांनी म्हटलंय.
विधानसभेच्या जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच सुरु झालीय का? असा प्रश्न निर्माण होतोय. सांगलीच्या जागांवरुन काँग्रेस आणि शरद पवार गटात अप्रत्यक्षपणे इशारे पाहायला मिळाले आहेत. आता साताऱ्यात शरद पवार गटानं 7 जागांची मागणी केलीय. मात्र, आगामी काळात कोणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.