सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार? शरद पवार EXCLUSIVE मुलाखतीत काय म्हणाले?
"त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी चेहऱ्याची गरज होती. ते मत व्यक्त केलं. आता परिस्थिती वेगळी आहे. निकाल लागू द्या. जागा किती येतात ते पाहू द्या. सरकार येऊ द्या", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा. मग तुम्ही काय करणार? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी मुद्देसूद भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना संसदीय राजकारणात इंटरेस्ट असल्याचं सांगितलं. तसेच विधानसभेची निवडणूक अजून पार पडलेली नाही. मतदान झालं नाही आणि त्याआधी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणं योग्य नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार? शरद पवारांची प्रतिक्रिया काय?
“तिचा इंटरेस्ट नाही. तिचा इंटरेस्ट संसदीय राजकारणात आहे, असं मला दिसतंय. लोक मागण्या काही करतील. शेवटी आपली पसंती काय आहे हे देखील बघावं लागतं. आमच्या पक्षामध्ये विधानसभेचे सदस्य एकत्र बसून निर्णय घेतील. दुसरी गोष्ट अशी बहुमत नाही, निवडणुकीचा निकाल नाही. त्याच्याआधीच मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणं याला अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. “लोकसभा वगळता सुप्रिया सुळेंना मी काहीच दिलं नाही. सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. लोक काही चर्चा करतील. पण माझ्या मतानुसार सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. आमच्या पक्षात सर्व नेते बसून निर्णय घेतील”, असंही शरद पवार म्हणाले.
“निवडणुका होऊ दिल्या पाहिजेत. किती नंबरला येतो, तो नंबर कसा आहे, तो 2-3 पक्षांचं मिळून एकत्र सरकार बनवायचं आहे की सिंगल पार्टीचा आहे. आता आमचा प्रश्न आला की सिंगल पार्टी म्हणून पण आम्ही तेवढ्या जागाच लढत नाहीयत की उद्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघावी. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊ. संख्या चांगली असेल, एकत्र बसू. साधारणत: ज्यांना जास्त जागा आहे त्यांना प्राधान्य देऊ आणि उत्तम सरकार लोकांना देऊ”, असं शरद पवार म्हणाले.
‘त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी चेहऱ्याची गरज होती’
शरद पवारांना यांना 2019 च्या विधानसभा निवडणुबाबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. “त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी चेहऱ्याची गरज होती. ते मत व्यक्त केलं. आता परिस्थिती वेगळी आहे. निकाल लागू द्या. जागा किती येतात ते पाहू द्या. सरकार येऊ द्या”, असं शरद पवार म्हणाले. तसेच “स्ट्राईक रेट काय आहे. लोकसभेत दहा जागा लढवल्या. आठ जिंकल्या. स्ट्राईक रेट काय आहे. जागा किती लढवल्या हे महत्त्वाचं नाही. किती निवडून येतील हे महत्त्वाचं आहे”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.