2004 मध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांपुढे प्रस्ताव, त्या बैठकीत नेमके काय घडले आले बाहेर
sharad pawar and ajit pawar: २००४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. शरद पवार यांची वेळ घेतली होती. त्या दिवशी रात्री ११ वाजताच्या विमानाने दिल्लीत गेलो. दिल्लीत जाऊन आम्ही पाच लोकांनी त्यांची भेट घेतली. सकाळी दिल्लीत पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यानंतर भूकंप झाला. शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनी बंड केले. ४० पेक्षा जास्त आमदार शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. परंतु या सर्व घडामोडींमध्ये २००४ आणि २०१९ मधील शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा होत असते. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडून माध्यमांमध्ये भूमिका मांडली जात आहे. परंतु शरद पवार गटाकडून ते दावे फेटाळून लावले जात आहे. आता २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आल्यावर पक्षातील पाच बडे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. शरद पवार यांच्यापुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांचे विरोधक असलेले विजय शिवतारे यांनी केला आहे. त्या बैठकीत नेमके काय घडले, ते त्यांनी सांगितले.
पाच नेते दिल्लीत भेटीसाठी
२००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२४ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने १५७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वाधिक ७१ आमदार निवडून आले तर काँग्रेसचे ६९ आमदार विजय झाले. दोन्ही पक्षात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा निर्णय होणार होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच नेते दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यात विजय शिवतारे, डॉक्टर महाजन, शिवाजीराव नलवाडे (मुंबई बँकेचे अध्यक्ष) , रवींद्र पवार (मुंबई मनपा) मुबारक खान (अल्पसंख्याक प्रमुख) हे असल्याचे विजय शिवतारे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
काय झाले त्या बैठकीत
विजय शिवतारे म्हणाले, २००४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. शरद पवार यांची वेळ घेतली होती. त्या दिवशी रात्री ११ वाजताच्या विमानाने दिल्लीत गेलो. दिल्लीत जाऊन आम्ही पाच लोकांनी त्यांची भेट घेतली. सकाळी दिल्लीत पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली. बैठकीत आम्ही सर्वांना राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत, आपण अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, असे पवार साहेबांना सांगितले.
अजितदादा धाडसाने काम करणारे नेते आहेत. त्यांच्यामुळे पक्षही वाढणार आहे. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी पवार साहेबांनी झटकून दिले. आपण दोन चार खाती जास्त घेऊ, पण मुख्यमंत्रीपद नको, असे त्यांनी म्हटले. त्यावेळी जर पवार साहेबांनी ऐकले असते तर आज जी परिस्थिती आहे ती आली नसती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला.