Baramati Lok Sabha Elections 2024 : बारामतीत शरद पवार यांनी लावली फिल्डींग, घरच्या लोकांवर जबाबदारी
Baramati Lok Sabha Elections 2024 : बारामती लोकसभा मतदार संघातील बुथ केंद्राची जबाबदारी शरद पवार यांनी वाटून दिली आहे. त्यानुसार भोर, वेल्हा, मुळशीची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर दिली आहे. पुरंदरचा गड आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप सांभाळणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या या मतदार संघातील प्रचार तोफा रविवारी थंडावल्या. बारामतीमधील 23 लाख 72 हजार मतदार उद्या सात मे रोजी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भवितव्य ठरवणार आहे. पवार कुटुंबातील या राजकीय लढाईसाठी शरद पवार वयाच्या 84 वर्षीय सक्रीय आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी राहिलेल्या लोकांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवली. आता बारामती मतदान होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फिल्डींग लावली आहे. आपल्या विश्वासू सरदारांवर जबाबदारी दिली आहे.
अशी दिली जबाबदारी
बारामती लोकसभा मतदार संघातील बुथ केंद्राची जबाबदारी शरद पवार यांनी वाटून दिली आहे. त्यानुसार भोर, वेल्हा, मुळशीची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर दिली आहे. पुरंदरचा गड आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप सांभाळणार आहे. इंदापूरमध्ये स्वत: रोहित पवार तळ ठोकरणार आहे. बारामतीची कामगिरी अजित पवार यांचे सख्ख्ये भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार पाहणार आहेत. खडकवासला सचिन दोडके यांच्याकडे दिला असून दौंड नामदेव ताकवने पाहणार आहे. तसेच पवार कुटुंबातील सदस्यसुद्धा बूथ यंत्रणा सांभाळणार आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा
सततच्या सभा आणि राज्यव्यापी दौऱ्यांमुळे शरद पवार यांची प्रकुती काल अत्यवस्थ होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचा आवाज बसला होता. त्यामुळे दोन दिवस भाषण करण्यास शरद पवार यांना मनाई केली होती. शरद पवार यांचे आजचेही सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
बारामतीत मतदानासाठी प्रशासन सज्ज
बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. एकूण 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी 13 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे.
आठवडे बाजार राहणार बंद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी सर्व आठवडे बाजार बंद राहणार आहे. बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडे बाजार बंद राहणार आहे.