Sharad Pawar : चिपळूणच्या रस्त्याने जाणारा पेशंट मृत्यूच्याच रस्त्याने जाईल; शरद पवार यांचा संताप
Sharad Pawar : "काल मी सातारला होतो. हेलिकॉप्टरला आलो. कराडला जाऊन इथे यायचं होतं. माझी एक सवय आहे. वेळ असेल तर गाडीने प्रवास करतो. कारण पिकं बघता येतात. लोक भेटतात. निवेदन देतात. त्यांचे प्रश्न असतात. त्यांच्याशी बोलता येतं. रस्ते कसे आहेत हे पाहता येतं" असं शरद पवार म्हणाले.
“नवीन लोक तयार करायचे, त्यांना संधी द्यायची. त्यांच्या मार्फत राज्याचा चेहरा बदलेलं कसं हे पाहत असतो. काही लोक येतात. साथ देतात. काही निघून जातात. त्याची काही चिंता करायची नाही. मी आता येताना इथे बोर्ड पाहिला. माझ्या नावाचा बोर्ड होता. त्यावर माझा फोटो होतो आणि मी येतोय असं लिहिलं होतं. दोन दिवसांपूर्वी इथे सभा होती. एकाने सांगितलं तो येतोय अजून. माझी विनंती आहे की मी येतो म्हणजे आलोय. आता इथून रायगडला जाणार आहे. त्यामुळे मी रोह्याला येतोय की आणखी कुठे येतोय याचा पत्ता लवकरच कळेल. त्याला फारसा वेळ लागणार नाही. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे” असं शरद पवार म्हणाले.
“आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवरही. सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. तो पडला. चौकशी केली. सरकारने आम्हाला काही सांगितलं. एकेकाळी नेव्ही माझ्या हाती होती. मी नेव्हीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं. राज्य सरकारनं सांगितलं वाऱ्यामुळे पुतळा पडला. मुंबईला शिवाजी पार्कात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इंडिया गेटजवळ पुतळा आहे. हे पुतळे 80 वर्षापूर्वीचे आहेत. समुद्राजवळ आहेत. भरपूर वारा आहे. त्या पुतळ्यांना कधी धक्का बसला नाही. आणि सिंधुदुर्गातील पुतळा पडतो. वाऱ्यामुळे? काय चाललंय हे. पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला. महाराजांचा पुतळा आणि त्यातही पैसे खाणं सोडत नाही. कसे लोक आहेत. महाराजांनी मावळ्यांना आदेश दिला की शेतातून जात असाल तर पिकाच्या देठाला हात लागता कामा नये. सर्वांना सोबत घेऊन जाण्यास सांगणारे शिवाजी महाराज आणि त्यांचा पुतळा. भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला पोहोचला हे यातून दिसून येतं” असं शरद पवार म्हणाले.
‘धोरणं आखली, योजना केल्या, पैसे दिले पण…’
“हेलिकॉप्टर माझ्याकडे होतं. मी सातारला हेलिकॉप्टरला सोडलं. म्हटलं तुम्ही दुपारी चिपळूणला या. मी गाडीने आलो. कराड ते चिपळून प्रवास केला. मी शेवटचा भाग सोडला तर महाराष्ट्रात इतके खराब रस्ते कुठे नाहीत. आज चिपळूनहून कराडला जायचं असेल, एखादा पेशंट कराडच्या हॉस्पिटलला जाणार असेल तर माझी खात्री आहे की या रस्त्याने गेल्यावर तो पेशंट निम्मा मृत्यूच्या रस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही याचा अर्थ मी चौकशी केली. लोकांना विचारलं. काही अधिकाऱ्यांना विचारलं. रस्ते इतके खराब कसे. ते म्हणाले, साहेब हे रस्ते तीनदा दुरुस्त झाले. तिनदा दुरुस्त झाल्यानंतर ही अवस्था आहे. याचा अर्थ सरकारने धोरणं आखली, योजना केल्या, पैसे दिले पण त्या योग्य ठिकाणी पोहोचले नाहीत” असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार मुख्यमंत्र्यांना का भेटणार?
“चार दिवसांपूर्वी पुण्यात अपघात झाला. तुम्ही पाहिलं असेल. पुणे पालिकेचा ट्रक पुण्याच्या रस्त्याने जात होता. तो एका खड्डयात पडला. रस्त्याने जाणारा ट्रक रस्त्यात खड्डा तयार होतो, त्यात पडतो. याचा अर्थ या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याची मर्यादा राहिली नाही. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागते. मी गाड्याने प्रवास करतो मला हे माहीत आहे. मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्याची माहिती देणार आहे” असं शरद पवार म्हणाले.