‘अयोध्येचे श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर, पण…’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
निपाणी | 16 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर भाष्य करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. “अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला. मग काही लोक कोर्टात गेले. आता निर्णय आला. मंदिर निर्माण होत आहे. पण रामाच्या नावाचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राजकारणासाठी होत आहे. धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर आज अधिक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. पण गरिबी हटवण्यासाठी त्यांनी काही केले असते तर बरं झालं असतं”, असा टोला शरद पवारांनी लगावला. “माझा एका निवडणुकीत पराभव झाला. मी मुंबईचा अध्यक्ष होतो. क्रिकेटच्या संस्थेत माझा बंगालच्या माणसाने पराभव केला. पण नाउमेद व्हायचं नाही. मी आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. एक दिवस मी जागतीक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झालो”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
“आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आहात. रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्या पंचगंगा कारखान्यात रावसाहेब पाटील 10 वर्षे संचालक होते. तसे निपाणी परिसरात व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत इथं सहकार रुजवला. साखर उद्योगाबरोबर सोसायट्या उभा केल्या. त्यांच्या विश्वासावर 1800 कोटींच्या ठेवी लोकांनी ठेवल्या. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. पण आज देखील शेतकरी कर्जात आहे. कर्जमाफीसाठी आम्ही या सरकारकडे वारंवार प्रयत्न करतोय”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
“या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं घेणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय”, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला.
‘अयोध्येचे श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर’
“अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. इथली मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलानेस झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी 10 दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा”, असा सल्ला शरद पवार यांनी मोदींना दिला.