लक्षात ठेवा, ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात… शरद पवार यांचा सज्जड दम
मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले होते. त्यावर मोदींनी टीका केली होती. आता तेच निर्णय मोदी स्वतः घेत आहेत. हा विरोधाभास लोकांना दिसतो आहे, असा टोला लगावतानाच मनमोहन सिंग यांचे दहा वर्ष आणि नरेंद्र मोदी यांचे दहा वर्ष याची तुलना जर केले तर मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले ते कुठलाही गाजावाजा न करता घेतले. किंवा घेतलेल्या निर्णयाचा कुठेही गाजावाजा केला नाही, असं शरद पवार म्हणाले.
आज माझ्यावर टीका करत आहात. बाबांनो, कधीकाळी तुम्ही माझ्यासोबत काम केलं. राजकारण करा. पण कुणी राजकारण करण्यासाठी गरीब जनतेला त्रास देत असाल तर ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाबळी असतात हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिला आहे. दौंड येथील सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जातात. तो त्यांचा अधिकारच आहे. पण पंतप्रधान म्हणून गेल्या दहा वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं. पण ते काय काम केलं हे सांगण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करत आहेत. देशाचे प्रश्न समजून घेण्यासाठी राहुल गांधी देशभर फिरले. लोकांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. आणि मोदी त्यांच्यावर शहजादा म्हणून टीका करत आहेत. देशासाठी त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आजींनी बलिदान दिलं. त्यांची हत्या झाली. याचं भान ठेवलं पाहिजे. पण पंतप्रधान व्यापक दृष्टीकोणातून विचार करत नाहीत. मोदी दिलेला शब्द पाळत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
बालपण्याच्या आठवणींना उजाळा
यावेळी शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच दिवसांनी आज इथं आलो. आधी यायचो. माझे ते सहकारी आता हयात नाहीत. तुम्ही आजही मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. माझा आणि दौंडचा जुना संबंध आहे. मी शाळेत शिकत असताना माझ्या घरी मोसंबीची बाग होती. भाजीपाला होता. हे सगळं घेऊन मी रविवारी दौंडच्या बाजारात येत असे. दौंडच्या बाजाराची मला जुनी आठवण आहे, असं शरद पवार म्हणाले.
राजकारण आणत नाही
1968 साली मी पहिल्यांदा विधानसभेसाठी उभा राहिलो. त्यावेळी दौंडकरांनी मला मदत केली. 1984 मध्ये लोकसभा मी लढवली. त्यावेळी सुद्धा मतं दिली. आज पुणे जिल्ह्यात 2 तालुक्यात सगळ्यात जास्त ऊस शिरूर आणि दौंड तालुक्यातून येतो. दौंड तालुक्याकडे ऊस उत्पादनाचा महत्त्वाचा तालुका म्हणून बघितलं जातं. कारखानदारी जेजुरी, इंदपूर ,बारामती, चाकण अशा MIDC काढल्या आणि हजारो लोकांना काम मिळाली. पण विकासात आम्ही कधी राजकारण आणलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.