शरद पवार भाजपला देणार धक्का, बडा नेता राष्ट्रवादीच्या मार्गावर
Sharad Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली आहे. शरद पवार स्वतः राज्याचे दौरे करत आहेत. आता भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार आहे.
चंदन पुजाधिकारी, नाशिक | 13 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अडचणीत आलेल्या शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणी सुरु केली आहे. शरद पवार स्वतः राज्याचे दौरे करत आहेत. जुन्या लोकांना भेटत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादीत फूट भाजपने पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले लक्ष भाजपकडे वळवले आहे. शरद पवार यांच्याकडून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु आहे. भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
हरिश्चंद्र चव्हाण भाजपपासून दूर
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपासून दूर आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवारांसमोर हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे.
शांतीगिरी महाराज यांची अपक्ष लढण्याची तयारी
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी शांतीगिरी महाराज इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु मंगळवारी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे आपणास तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याची भूमिका शांतीगिरी महाराज यांनी मांडली. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. परंतु सध्या ते मविआच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही.
प्रविण दरेकर यांनीही केली टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावर प्रवीण दरेकर यांनी ते ऑथोरिटी नाहीत, असे उत्तर दिले. तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.