शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जायचंय, मग ‘हे’ नियम वाचा
शिर्डीचे साईसंस्थान प्रशासन, आरोग्य व्यवस्था, नगरपालिका प्रशासन मंदिर उघडण्यासाठी सज्ज झाले आहे. (Shirdi Sai Temple visit Rules and Regulation)
शिर्डी : गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेली साईमंदिराची कवाडे उद्यापासून उघडणार आहे. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिक, भाविक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिर्डीचे साईसंस्थान प्रशासन, आरोग्य व्यवस्था, नगरपालिका प्रशासन मंदिर उघडण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशासाठी काही नियमावली करण्यात आली आहे. यानुसार मंदिरात मर्यादित भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच साईंच्या आरतीसाठीही केवळ 50 जणांनाच सहभागी होता येणार आहे. यासाठीही आरतीचे आरक्षित पास असणाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे. (Shirdi Sai Temple visit Rules and Regulation)
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आरतीचा पेड पास आवश्यक असणार आहे. आरतीवेळी फक्त 50 जणांनाच सहभागी होता येणार आहे. तसेच गावकऱ्यांसाठी आरतीनंतर दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार आहे. गावकऱ्यांना मतदान कार्ड दाखवून दर्शन मिळणार आहे. तर भाविकांना मात्र ऑनलाईन दर्शन पास घ्यावा लागणार आहे.
ठराविक वेळ आणि तारखेनुसारच भाविकांना दर्शन मिळणार आहे. दर्शनावेळी भाविकांना मोबाईल किंवा इतर वस्तू सोबत नेता येणार नाही, असेही यात नमूद करण्यातआले आहे.
मंदिरात मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच थर्मल स्कॅनिंग आणि नियम पाळणे बंधनकारक असेल. दररोज केवळ 3000 भाविकांना ऑनलाईन पेड पास दिला जाणार आहे. तसेच गर्भवती महिला, लहान बालकं, 65 वर्षावरील वयोवृद्धांना शिर्डी साई मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच भाविकांना फुल हार प्रसाद घेऊन जाता येणार नाही.
साईसंस्थानचे प्रसादालय सुरू होणार आहे. मात्र या प्रसादालयात मर्यादित भाविकांना भोजन दिले जाईल. साईबाबांच्या निवास व्यवस्थेसाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. 80 टक्के रूम या ऑनलाईन बुक होणार आहेत. केवळ 20 टक्के भाविकांना ऑफलाईन रुम बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविडचे सर्व नियम पाळत साईदर्शन देण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. पहाटेच्या काकड आरतीपासून भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे. (Shirdi Sai Temple visit Rules and Regulation)
संबंधित बातम्या :