शिंदे गटाचं तब्बल 124 पानांचं लेखी उत्तर, मुख्य नेतेपद ते पक्षाची घटना, ठाकरे गटाच्या सर्व प्रश्नांना कायदेशीर प्रत्युत्तर
शिंदे गटाने (Shinde Group) तब्बल 124 पानांचं लेखी उत्तर सादर केल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलं आहे. राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाकडून आज लेखी म्हणणं मांडण्यात आलंय. ठाकरे गटाने (Thackeray Group) ईमेलच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं. तर शिंदे गटाचे वकील प्रत्यक्ष निवडणूक आयोगात दाखल झाले आणि त्यांनी आपलं लेखी म्हणणं मांडलं. निवडणूक आयोगाकडून आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ठाकरे गटाकडून चार वाजता लेखी उत्तर सादर करण्यात आलं. तर शिंदे गटाच्या वकिलांकडून शेवटच्या मिनिटाला लेखी उत्तर मांडण्यात आलं. शिंदे गटाने तब्बल 124 पानांचं लेखी उत्तर सादर केल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलं आहे. राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.
“ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना आमच्याकडून लेखी स्वरुपात उत्तर देण्यात आलंय. आता दोन्ही बाजूंचा लेखी स्वरुपातील युक्तिवादाचा अभ्यास करुन निवडणूक आयोग निर्णय घोषित करतील”, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.
“आमच्या युक्तिवादात याच गोष्टीवर भर दिला गेलाय की, शिवसेनेच्या घटनेविषयी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय”, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.
‘पक्षाची मान्यता मतदानावर अवलंबून’
“पक्षाची मान्यता मतदानावर अवलंबून असते. त्यामुळे मतदान हे आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींवर अवलंबून असते. ज्यांकडे मतदान जास्त त्यांचं मतदान गृहित धरलं जातं. त्यानुसार पक्षाची मान्यता गृहित धरली जाते. असे सगळे मुद्दे आम्ही निवडणूक आयोगात मांडले आहेत’, अशी माहिती शेवाळेंनी दिली.
‘एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद हे घटनात्मक’
“एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद हे घटनात्मक आहे. ही बाजू आम्ही संपूर्णत: निवडणूक आयोगासमोर मांडलेली आहे. संविधानानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडून, त्याची अंमलबजावणी करुन घटनात्मक ते पद निर्माण करण्यात आलं आहे. ही सर्व कायदेशीर बाजू आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडलेली आहे”, असा दावा त्यांनी केला.
“शिवसेना पक्षाच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण यांना माहिती नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली घटना ही वेगळी होती. तर उद्धव ठाकरेंनी तयार केलेली घटना ही वेगळी होती. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हाती घेतली तेव्हा घटना बदलण्यात आली होती. त्यावेळची घटना वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची घटना ही बाळासाहेबांच्या घटनेनुसार तयार केलेली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या घटनेला मानतो. त्यामुळे त्यानुसार आम्ही सर्व सबमिशन केलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.
‘एखादी घटना किंवा उठाव एकाच दिवशी होत नसतो’
“एखादी घटना किंवा उठाव एकाच दिवशी होत नसतो. त्यासाठी काही कारणं असतात. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यानंतर अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या आमदार-खासदारांसोबत अन्याय झाला त्यातूनच ही घटना घडली. त्यावेळची ध्येय धोरणं वेगळी होती. पण नंतर ते बदललं. त्यामुळेच हा सर्व उठाव झालाय”, असा दावादेखील त्यांनी केला.
“शिवसेनेच्या दोन घटना आहेत. एक बाळासाहेबांनी बनवलेली आणि दुसरी उद्धव ठाकरेंनी बनवलेली घटना. हा एक टेक्निकल मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या नियुक्त्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने सादर केलेल्या नियुक्त्या या मतदानातून निवड झालेल्या आहेत. त्यावेळी लोकशाही होती. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकशाही पाळली गेलेली नाही हा मुद्दा निवडणूक आयोगासमोर आलेला आहे”, असं मत राहुल शेवाळे यांनी मांडलं.