आदिवासी मुलीचं शव मीठात, न्यायाच्या प्रतीक्षेत, नीलम गोऱ्हे संतापल्या
स्थानिक खासदार, आमदार यांनी काहीच पावले का उचलली नाहीत, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. हलगर्जीपाणा करणार्यांवर कठोर कारवाई करावी, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.
मुंबईः नंदूरबार येथील आदिवासी मुलीवर अत्याचार (Rape Case) झाल्याचा आरोप असूनही या घटनेचा योग्य तपास केला नसल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारावर शिवसेना (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यात त्यांनी एक पत्रकार परिषद घेत आदिवासी विकास मंत्रालय आहे की आदिवासी भकास मंत्रालय असा सवाल केलाय. विवाहितेवर झालेल्या अत्याचाराकडे आयुक्तांनी एवढे दिवस दुर्लक्ष का केलं? पालकांनी चक्क दीड महिना तिचं शव मीठात पुरून ठेवलंय. दीड महिना उलटून गेल्यानंतर आता कुठे तपासाला वेग आलाय, एवढे दिवस काय केलं, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केलाय.
काय आहे घटना?
नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात खडक्या गावात एका विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. संशयितांनी विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी तसेच गावकऱ्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी मृत मुलीच्या शवाचं पोस्टमॉर्टेम त्या दिशेनं केला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
आदिवासी भकास मंत्रालय?
नंदुरबार येथील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना धारेवर धारलं. राज्य सरकार आदिवासी विकास ऐवजी आदिवासी भकास मंत्रालय चालवत आहे का, असा सवाल त्यांनी केला. आदिवासी मुलीचा मृत्यू संशयास्पद असूनही केवळ आत्महत्येची नोंद कशी घेतली? त्याच दिशेने पोलिसांनी शव विच्छेदन का केले? पालकांनी शव विच्छेदन नीट होण्यासाठी तिचा मृतदेह घरातच मीठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला आहे. पण पोलीस आणि आरोग्य विभाग बेकायदेशीर माहिती देत असल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलाय.
डीएनए तपासणी व्हावी..
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ‘ शवविच्छेदन करताना महिलांच्या बाबतीत तर त्यांच्या गोपनीय भागातही काही जखमा अथवा पुरावे आहेत का, याची तपासणी केली जात असते. आरोपी आणि त्या महिलेचे डी एन ए तपासून त्याबाबत तपासणी करणे आवश्यक आहे.
आदिवासी समाजाची फरफट होत असून आदिवासी समाजाबाबत सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत आहेत.
स्थानिक खासदार, आमदार यांनी काहीच पावले का उचलली नाहीत, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. हलगर्जीपाणा करणार्यांवर कठोर कारवाई करावी, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.