‘नापास शब्द हा माझ्या जिव्हारी लागला’, शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, केलं मोठं वक्तव्य
शिवसेना नेते तथा माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून भाजपच्या हायकमांडला पाठवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या रिपोर्टकार्डमध्ये संजय राठोड यांचं रिपोर्ट कार्ड देखील आहे. पण या रिपोर्ट कार्डमध्ये ते नापास झाल्याची चर्चा आहे. याच चर्चांवर संजय राठोड यांनी भूमिका मांडत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर 7 दिवस उलटून गेले तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. खातेवाटपात निर्माण झालेल्या पेचामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याची माहिती आहे. महायुती सरकारमध्ये कुणाला मंत्रिपद द्यायचं आणि कुणाला नाही, याबाबतचा निर्णय भाजपचं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. महायुतीच्या तीनही पक्षांच्या प्रमुखांनी आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांचं आणि आमदारांचं रिपोर्ट कार्ड भाजपच्या हायकमांडला पाठवलं आहे. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बघून मंत्रिपद द्यायचं की नाही? याबाबतचा निर्णय घेणार आहेत. या रिपोर्ट कार्डमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड हे नापास झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच नापास शब्दावर संजय राठोड यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्याला हा नापास शब्द खूप जिव्हारी लागल्याचं स्वत: संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड नेमकं काय म्हणाले?
“नापास शब्द हा माझ्या जिव्हारी लागला. मी नापास होऊच शकत नाहीत. मी होतकरू विद्यार्थी, मंत्रीपद कुणाला द्यायचं हा अधिकार त्यांचा आहे. पण अशाप्रकारे मंत्रिमंडळातून बाजूला करण्यासाठी मला नापास करणं हे माझ्या मनाला लागलं, आणि मला वेदना झाल्या”, अशी खंत संजय राठोड यांनी व्यक्त केली. “मी बंजारा समाजाचं नेतृत्व करतो, आणि सव्वा कोटी जनता माझ्या सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नंगारा वास्तू संग्राहालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांनीही माझं कौतुक केलंय. मग मी नापास कसा असेन?”, असा सवाल संजय राठोड यांनी केला.
“मी मागच्या अडीच वर्षात जी मतदारसंघात कामे केली, त्यामुळे मी नापास होऊ शकत नाही. वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये अशा बातम्या आल्याने मी व्यथित झालो आहे. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याकडेही भावना व्यक्त केल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
शिवसेनेचेच दुसरे नेते दीपक केसरकर यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मंत्रिमंडळात खरंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. हे पूर्वीपासून माझं सांगणं आहे आणि तसं होताना यावेळी दिसेलही”, असं मोठं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी महायुतीत सारं काही सुरळीत आहे, असंही म्हटलं. “कोणतं खातं कुणाला मिळणार? याचा निर्णय वरिष्ठ घेतील. तिढा देखील ते सोडवतील. पण आमचं म्हणणं आहे की महायुतीमध्ये कुठलाही संभ्रम नाही. सगळं काही आलबेल आहे आणि हीच युती भविष्यामध्ये पाच वर्षे टिकेल”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली.