Sanjay Raut : हातात चाबूक घेत संजय राऊत म्हणाले, मी याचं काय करू?; कार्यकर्ता म्हणाला, असू द्या, सोमय्यांना मारायला
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेत त्यांनी मेळावेही घेतले. आज सकाळी त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
कोल्हापूर: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची लेखणी आणि त्यांचा हजरजबाबीपणा याची नेहमी चर्चा होत असते. टायमिंगवर शब्दांचा षटकार कसा मारायचा हे राऊतांना अचूक माहीत आहे. त्याची प्रचिती वारंवार येत असते. राऊतच काय त्यांचे कार्यकर्तेही तितकेच हजरजबाबी आहेत. त्याची प्रचिती आज आली. शिवसंपर्क (shiv sampark) अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. संजय राऊत यांनी पक्षाचे हितचिंतक असलेल्या एका मान्यवर व्यापाऱ्याच्या ‘बालजो’ या डिपार्टमेंटल स्टोअर्सलाही भेट दिली. यावेळी राऊत यांना अनेक भेटवस्तूंसोबत त्या व्यापाऱ्याने एक चाबूकही भेट दिला. राऊत यांनाही तो चाबूक आवडला. चाबूक हातात धरून त्यांनी फोटोसाठी पोझही दिली. फोटो काढून झाल्यावर राऊत म्हणाले मी याचं काय करू? तेव्हा पाठीमागे एक जण हळूच पुटपुटला असू द्या… किरीट….सोमय्या यांना (kirit somaiya) मारायला… आणि उपस्थितांमध्ये एकच हशां पिकला.
शिवसेना नेते संजय राऊत कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेत त्यांनी मेळावेही घेतले. आज सकाळी त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोणताही राजकीय चर्चा नाही
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्यसभा निवडणुकीचा विषय निघाला नाही.ही निव्वळ शुभेच्छा आणि आशीर्वाद भेट होती. श्रीमंत शाहू महाराज हे शाहूंचे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही कामं करतो. मुख्यमंत्र्यांचाही मला निरोप होता, महाराजांना भेटा, त्यांचे आशीर्वाद घ्या. उद्धव ठाकरेंनीही श्रीमंत शाहू महाराजांशी फोनवरून प्रदीर्घ चर्चा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटायला येतो म्हणून सांगितलं, असं राऊत यांनी सांगितलं.
फडणवीसांना फटकारलं
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किडक्या डोक्यांच्या लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. त्यावरून राऊत यांनी फडणवीसांना फटकारले. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. छत्रपतींचा अपमान करू नका असा. चुकीच्या माहितीवर शाहू महाराज बोलणार नाहीत. फार ज्येष्ठ आहे ते. ज्या घराण्याचा वारसा ते घेऊन जात आहेत. तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केली जात नाहीत, असं त्यांनी सांगितलं.