‘विजयी झालो नाही तर गळफास घेईन’, शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याची सांगोल्यात चर्चा
जर यंदा विजयाचा गुलाल उधळला नाही तर गळफास घेईन, असं आव्हान शिंदे गटाच्या शहाजी पाटलांनी स्वीकारलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आव्हान देताना त्यांनी सांगोल्यातून विजयाचा विश्वास व्यक्त केला. पण आजवर निवडणुकांमध्ये पैशांची पैज लागत असताना शहाजी पाटलांनी थेट जीवाचीच बाजी लावण्याचं चँलेज घेतलं आहे.
“संजय राऊत सकाळी 9 वाजता महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवेन. मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन”, असं शिवसेना नेते शहाजी पाटलांनी म्हटल्यानं मतदारसंघात याची चर्चा सुरु झाली आहे. 2019 ला शहाजी पाटील मोठ्या रंजक समीकरणांनी जिंकून आले. सांगोल्यात अनेक दशकं शेकापचे नेते गणपतराव देशमुख आमदार राहिले. त्यांच्या निधनानंतर गेल्यावेळी त्यांचे नातू अनिकेत देशमुखांनी निवडणूक लढवली. त्यात शहाजी पाटलांचा निसटता विजय झाला. आकडे बघण्यासाठी 2019 मधल्या सांगोल्याची निवडणुकीचा ट्विस्ट समजून घेऊयात.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शेकापकडून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांनी अर्ज भरला. आघाडीत सांगोल्याची जागा परंपरेप्रमाणे शेकापला दिली गेली. पण राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे सुद्धा इच्छूक असल्यामुळे अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला होता. दुसरीकडे शेकापच्या विरोधात प्रमुख उमेदवार म्हणून शिवसेनेचे शहाजी पाटील उभे होते. प्रचार सुरु झाल्यानंतर दीपक साळुंखेंनी उमेदवारी मागे घेत शहाजी पाटलांना पाठिंबा दिला. मात्र प्रत्यक्षात साळुंखेंचा निवडणूक अर्ज मागे घेतलाच गेला नाही. त्यावर आपण अर्ज माघारीच्या दिवशी वेळेवर पोहोचू न शकल्याचं कारण दीपक साळुंखेंनी दिलं.
2019 च्या निवडणुकीचा निकाल काय?
आता ईव्हीएम मशीनवर दीपक साळुंखे अपक्ष म्हणून उमेदवार होते. पण प्रचारात ते स्वतः आपल्याऐवजी शहाजी पाटलांना मतदान करा म्हणून फिरले. निकालावेळी वेळेअभावी फॉर्म मागे घेतला गेला नसल्याचं सांगणाऱ्या दिपक साळुंकेंना 915 मतं पडली. आपण उमेदवार असलो तरी शहाजी पाटलांना मतं द्या सांगणाऱ्या साळुंखेंना 915 लोकांनी मतं टाकली. शेकापच्या अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 मतं मिळाली आणि शिवसेनेच्या शहाजी पाटलांना 99 हजार 464. शहाजी पाटील फक्त 768 मतांनी जिंकून आले.
यावेळी तेव्हा अखंड शिवसेनेकडून लढलेले शहाजी पाटील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. तेव्हा राष्ट्रवादीचे बंडखोर आणि शहाजी पाटलांना पाठिंबा देणारे दीपक साळुंखे यावेळी शहाजी पाटलांविरोधातच ठाकरे गटाचे उमेदवार बनले आहेत आणि शेकापकडून गणपतराव देशमुखांचे नातू अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत.
शहाजी बापू त्यांच्याच 3 विधानांनी सर्वाधिक चर्चेत
सांगोल्याचा निकाल काहीही लागो, शहाजी बापू त्यांच्याच 3 विधानांनी सर्वाधिक चर्चेत आहेत. पहिलं म्हणजे 2019 त्यांचा प्रचार करणारे दीपक साळुंखे हे पुढचे आमदार असतील, म्हणून शहाजी पाटलांनी वचन दिलं होतं. यंदा त्या एकमेकांविरोधातच सामना होतोय. त्यात शहाजी बापूंनी निवडणूक हारल्यास गळफास घेण्याचं चँलेज दिल्यानं सांगोल्यात चर्चा होतेय, आणि तिसरं म्हणजे ज्या रफिक भाईच्या फोनमुळे शहाजी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्याच रफीक भाईच्या गाडीत ५ कोटी रुपये सापडल्यानं ते देखील चर्चेत आले आहेत. म्हणजे गुवाहाटीत असताना रफिक भाईमुळे शहाजी बापू सर्वत्र पोहोचले आणि यावेळी शहाजीबापूंच्या जवळीकतेमुळे रफिक भाई बातम्यांमध्ये झळकत आहेत.