मंत्रालयात दालन मिळताच मंत्री संजय राठोड अॅक्शन मोडमध्ये, बोलावली महत्त्वाची बैठक
महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्री संजय राठोड यांनी दुष्काळ निर्मूलनासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचं १०० पेक्षा जास्त सामाजिक संस्थांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीला प्रतिष्ठीत नाम फाऊडेंशन, पाणी फाऊंडेशन सारख्या नामंकित संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन आता 18 दिवस झाली आहेत. या दरम्यानच्या काळात नवं सरकारचं मंत्रिमंडळही स्थापन झालं आहे. या मंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर झालंय. तसेच त्यापाठोपाठ मंत्र्यांची दालने आणि बंगल्यांचं वाटपही करण्यात आलं आहे. मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आल्यानंतर आता लगेच मंत्री संजय राठोड हे कामाला लागले आहेत. त्यांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी संजय राठोड यांनी बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपत घेतल्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, अशी चर्चा होती. तर संजय राठोड यांनी मंत्रिपदासाठी प्रचंड फिल्डिंग लावली होती. विशेष म्हणजे महंतांनी यासाठी प्रयत्न केले होते. तरीही राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? याबाबत साशंकता होती. अखेर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यानंतर राठोड आता चांगलेच कामाला लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संजय राठोड यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
‘दुष्काळ मुक्त महाराष्ट्रा’साठी मंत्री संजय राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलीच महत्त्वाची बैठक बोलवली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० योजने अंतर्गत पाणलोट यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेसंदर्भात मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ‘दुष्काळ मुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी त्याबरोबर पाण्याचे स्त्रोत वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या १००हून अधिक NGO ना निमंत्रण देण्यात आलं आहे.
यामध्ये प्रतिष्ठीत नाम फाऊडेंशन, पाणी फाऊंडेशन सारख्या नामंकित संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकिला आदर्श गावचे हिवरे बाजारचे कार्यकरी अध्यक्ष पोपटराव पवार ही करणार मार्गदर्शन आहेत. मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावर उद्या दुरारी ३ वाजता ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय महत्त्वाचा निर्णय घेतला जातो? त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे.