‘मी पुन्हा येईन…’, आता शिवसेनेच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
तुम्हालाही अडीच वर्ष थांबवावे लागणार आहे. या अडीच वर्षांत कुठे कामावर कमी पडणार नाही. त्याची ग्वाही देतो. त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी ‘मी पुन्हा येईन…’, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची चर्चा गेली काही वर्ष राज्यात सुरु होती. फडणवीस विरोधक त्या वक्तव्यावरुन त्यांना घेरत होते. परंतु २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि त्यांनी ‘मी पुन्हा येईन…’, हे वक्तव्य खरे करुन दाखवले. आता फडणवीस यांच्यानंतर शिवसेनेतील बड्या नेत्याने ‘मी पुन्हा येईन…’ असे वक्तव्य केले. सध्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केले आहे. अडीच वर्षानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार असल्याचे विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास आहे, तोपर्यंत शिवसेनेत असणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन याचा आशावाद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, तुम्हालाही अडीच वर्ष थांबवावे लागणार आहे. या अडीच वर्षांत कुठे कामावर कमी पडणार नाही. त्याची ग्वाही देतो. त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे, असे त्यांनी म्हटले.
…त्यानंतर कार्यकर्त्यांचा निर्णय
अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत, पक्ष सोडणार आहेत, अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, जो पर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे. तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे. ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल तो निर्णय मी घेईल, असे सांगत त्यांना पक्षाबाहेर पडण्याचे संकेत दिले. परंतु शिंदे साहेबांचा विश्वास असेपर्यंत परिवाराचा सदस्य म्हणून काम करणार आहे.
राबसाहेब दानवे यांच्यावर निशाणा
अब्दुल सत्तार म्हणाले, हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला त्यांचे मी आभार मानतो. माझा 61 वा जन्म दिवस इतक्या उत्साहात साजरा होईल, असे वाटले नव्हते. हजारोंच्या संख्येने लोक आले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. मला अनेक पदे मिळाली ती या मित्रांमुळे. मी 26 वर्षांपासून आमदार आहे. 4 वेळा सिल्लोडचा आमदार झालो. परंतु काही लोक सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता म्हटले.