एकनाथ शिंदेंचा आणखी एक शिलेदार मनोज जरांगेंच्या भेटीला, अंतरवालीत घडामोडींना वेग
विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, सध्या अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगणार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये आता उडी घेतल्यानं अनेक ठिकाणी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक नेत्यांनी आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, शनिवारी मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज लगेचच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे, संजय शिरसाट आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. मात्र भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
संजय शिरसाट यांच्यापूर्वी शनिवारी उदय सामंत यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली होती. अतंरवाली सराटीच्या सरपंचांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये जवळपास वीस ते 25 मिनिटं चर्चा झाली, त्यानंतर आता शिरसाट यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीमध्ये मराठा बांधवांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली, जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तिथे उमेदवार उभे करा आणि जिथे शक्यता नाही तिथे ज्या उमेदवाराला आपल्या मागण्या मान्य आहेत, त्याला पाठिंबा द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.