शिवसेना आमदार संतोष बांगर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार? ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवसेना नेते संतोष बांगर यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लिपमध्ये एक मराठा कार्यकर्ता आणि संतोष बांगर यांच्यात संभाषण सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत आहेत.
हिंगोली | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूर्मीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून नेतेमंडळींना आता काळे झेंडे दाखवले जात आहेत. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी मराठा कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. संतोष बांगर यांना फोन करणारी व्यक्ती स्वत:ची ओळख आपण मराठा कार्यकर्ता असल्याची करुन देतो. तसेच आपलं नाव रमेश पाटील असल्याचं सांगतो.
मराठा कार्यकर्ते रमेश पाटील संतोष बांगर यांना मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर संतोष बांगर हो, असं उत्तर देतात. दोघांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पण या ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं संभाषण काय?
संतोष बांगर – हॅलो
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – बांगर साहेब, जय भगवान बाबा!
संतोष बांगर – जय भगवान बाबा
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – मराठा आरक्षणाचं काय चालूय?
संतोष बांगर – चालूय काम
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – किती दिवस लागतील?
संतोष बांगर – काय माहिती, साहेब करतील ना.
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – तुम्हीपण ओपनमधून निवडून आले ना साहेब, तुमचंही बोलायचं काम आहे ना?
संतोष बांगर – अहो, मीच मराठा आहे. तुम्ही काय ओपन म्हणता?
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – मी तुम्हाला काय बोललो का भाऊ. मी तुम्हाला मराठाच मानलं.
संतोष बांगर – मी पण तेच म्हणालो ना, त्याच्यात काय. ओपनमधून निवडून यायचं काय, मीच मराठा आहे.
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – ठीक आहे ना मग. मराठा समाजासाठी तुम्ही राजीनामा देऊन टाका.
संतोष बांगर – हा. शंभर टक्के देवून टाकू. काही काळजी करु नका.
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – कधी?
संतोष बांगर – अहो, आज देतो.
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – शब्दावर कायम राहा
संतोष बांगर – अरे शब्दाला जागतो.
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – तुम्ही उद्या सकाळी १२ वाजेनंतर राजीनामा देवून टाका मग
संतोष बांगर – अरे शंभर टक्के. तुम्हाला राम कदमला फोन करायला लावतो. तुम्हाला राम कदमने फोन केला होता ना? तुम्हाला रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची खूप सवय आहे ना?
मराठा कार्यकर्ता रमेश पाटील – हम्म
संतोष बांगर – राम कदमला तुम्हाला फोन करुन रेकॉर्डिंग व्हारल करायला लावतो.