sanjay raut on happiness index: निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ नाही, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका
भरमसाट पैसे खर्च करून राज्यकर्त्यांनी जाहिराती केल्याने जनता आनंदी होत नाही. फिनलँडप्रमाणे ब्रिटनही तसा आनंदीच देश आहे, पण हा आनंद आणि मोठेपण कशात आहे? ब्रिटनचे मोठेपण हे मुकुट घालणाऱ्या त्यांच्या सम्राज्ञीत नाही, राजपुत्र चार्ल्समध्ये नाही.
मुंबई: भरमसाट पैसे खर्च करून राज्यकर्त्यांनी जाहिराती केल्याने जनता आनंदी होत नाही. फिनलँडप्रमाणे ब्रिटनही तसा आनंदीच देश आहे, पण हा आनंद आणि मोठेपण कशात आहे? ब्रिटनचे मोठेपण हे मुकुट घालणाऱ्या त्यांच्या सम्राज्ञीत नाही, राजपुत्र चार्ल्समध्ये नाही, त्यांच्या भव्य महालात नाही, तर त्यांच्या स्वतंत्र बाण्याच्या संसदेत, जिवापाड जपलेल्या लोकशाहीत व घटनेत आहे. जगावरचे साम्राज्य गमावूनही ब्रिटन आनंदी आहे व युक्रेन बेचिराख करूनही पुतीन (putin) व त्यांचा रशिया दुःखी आहे. चार राज्यांत विजय पताका फडकवूनही भाजपच्या (bjp) चेहऱ्यावर आनंद नाही व जनता, देश सुखी नाही. निवडणुका जिंकल्या, पण देश ‘आनंदी’ राहिला नाही, असा टोला लगावतानाच देश जिंकूनही राजा आनंदी नाही. मग प्रजा कशी आनंदी राहणार?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून हा सवाल केला आहे. ‘हॅपिनेस इंडेक्स’वरून राऊत यांनी भाजपला चांगलेच चिमटे काढले आहे. देशाचे मोठेपण नेमके कशात असते आणि देशाचा आनंद कशात असतो, यावर एकदा संसदेत चर्चा व्हायला हवी. संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील ‘आनंद’ संपला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला; पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे 121 व्या क्रमांकावर आहे. भाजप जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
राजकारणातला आनंद संपला
देशाच्या राजकारणातला आनंद संपला आहे. सूडाचे, द्वेषाचे प्रवाह वाहत आहेत. एक दुसऱ्यांना संपवून टाकायचे या आनंदात जगणाऱ्यांच्या हाती राजकारणाची सूत्रे आहेत. त्यांनी लोकांना अंध भक्त आणि गुलाम केले. नोटाबंदीच्या काळात लोकांना बँकांच्या रांगेत उभे केले. लोक नोकरीसाठी आणि रेशनसाठी वर्षानुवर्षे रांगेत आहेत. काम करून घेण्यासाठी लाच द्यावीच लागते. पंजाब आणि दिल्लीत ‘आप’चे सरकार आले. त्यांनी ठरवले, लोकांना रेशनसाठी यापुढे रांगेत उभे राहावे लागणार नाही, लोकांना घरपोच रेशन मिळेल. या निर्णयाची विरोधकांनी खिल्ली उडविली. हे कसे शक्य आहे? त्यावर अरविंद केजरीवाल म्हणाले, ”का शक्य नाही? घरपोच पिझ्झा मिळतो, मग गरीबांना रेशन का नाही?” हा आनंदच आहे. असे अनेक आनंद आपण गमावून बसलो आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अच्छे दिन कोठे गेले?
भारतातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ‘अच्छे दिन’ म्हणजे लोकांना आनंदी ठेवण्याचा वायदा. भाजप व मोदी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत गेले, पण देश आनंदयात्री बनला नाही. निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला, पण आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तान आपल्या वर आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने तुम्हाला मतदान केले, पण सर्वाधिक बेरोजगारी, गरिबी त्याच राज्यात आहे. कोविड काळात तर गंगेत प्रेतेच वाहत होती, पण आता योगींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तरीही त्यांचे मन दुःखी आहे. कारण मंत्रिमंडळातील यादी त्यांच्या मर्जीने बनली नाही. मग राज्य आनंदी कसे होणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
‘मनसे भाजपची बी टीम बनली’, जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार; भाजपवरही निशाणा
Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड