मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी, पोलिसांनी तातडीने उचलले मोठे पाऊल
ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ३ जणांची पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत केली होती.
चंदन पुजाधिकारी, नाशिक, 16 डिसेंबर | भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत मुंबई बॉबस्फोटातील आरोपीसंदर्भात पार्टीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सलीम कुत्तासोबतचा फोटो विधानसभेत दाखवला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असणाऱ्या सलीम कुत्तासोबत पार्टी प्रकरणानंतर वादळ निर्माण झाले. नितेश राणे यांनी यासंदर्भातील एका व्हिडिओचा दाखवला. त्यात ‘मै हूं डॉन गाण्यावर’, सलीम कुत्तासोबत ठाकरे सुधाकर बडगुजर यांचा डान्स आहे. हा व्हिडिओ 6 वर्षांआधीचा आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरु केली. या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांच्या सोबत असणाऱ्या अन्य तिघांची पाच तास कसून चौकशी करण्यात आली.
बडगुजरसह तीन जण चौकशीच्या फेऱ्यात
ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बडगुजर यांचे समर्थक आणि व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या ३ जणांची पोलिसांनी चौकशी केली. पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग या तिघांची पाच तास चौकशी केली. सलीम कुत्ता याच्यासोबत ओळख, भेट आणि संबंध कसा आला, याबाबत पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सलीम कुत्ता याचे नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुधाकर बडगुजर यांचीही चौकशी
विधानसभेत सलीम कुत्ता प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा होताच नाशिक पोलिसांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी उबाठा शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलवले. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटकडून ही चौकशी सुरु करण्यात आली. पोलिसांचा निरोप मिळाल्यानंतर सुधाकर बडगुजर नाशिक पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: बडगुजर यांची चौकशी सुरु केली.
भाजपचे नाशिकमध्ये आंदोलन
ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपा देखील आक्रमक झाली आहे. बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. भाजपकडून नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘१९९३ मधील बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत पार्टी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा धिक्कार असो’, अशा आशयाचे फलक झळकवून करण्यात आले.