‘पडद्यामागे काहीतरी घडतंय-बिघडतंय, आगे आगे देखो होता हैं क्या?’, ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

| Updated on: Jul 17, 2024 | 6:50 PM

"मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा हे केवळ गाजर आहे. ज्यांना मंत्री व्हायचं होतं त्यांनी आशा सोडली आहे. ते आता म्हणतात की, आम्हाला बळीचा बकरा बनवू नका. दोन वर्ष सत्तेचे मजे तुम्ही घेतले आत्ता दोन महिन्यासाठी तोंडाला पानं पुसणार आणि मतदारसंघांमध्ये आम्ही निवडून येऊ की नाही येऊ? हा त्यांच्यासमोर पेचप्रसंग आहे", असा दावा ठाकरे गटाच्या नेत्याने केला.

पडद्यामागे काहीतरी घडतंय-बिघडतंय, आगे आगे देखो होता हैं क्या?, ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
उद्धव ठाकरे
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी आगामी काळात कुठपर्यंत जातील त्याचा आताच अंदाज बांधणं कठीण आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून काही आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबत आताच सांगणं कठीण आहे. कारण विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यास अद्याप तीन महिने आहेत. पण तरीदेखील काही ठिकाणी पडद्यामागे भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे.

नुकतंच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावर हिंगलोची ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यात बंद दाराआड बैठत झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “अब्दूल सत्तार आमच्या संपर्कात नाहीत. पण काहीतरी घडतंय आणि बिघडतंय एवढं मात्र नक्की, आगे आगे देखो होता हैं क्या?”, असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

‘मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा हे केवळ गाजर’

“अब्दुल सत्तार किती दिवस महायुतीमध्ये राहतील हे पाहावे लागेल. टोपी कधी काढतील ते देखील सांगत नाहीत. कारण तेच आता म्हणताय की लवकरात लवकर शेतकऱ्यांची मागणी १५ दिवसांत पूर्ण करा. त्यांचा मोबदला द्या. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा हे केवळ गाजर आहे. ज्यांना मंत्री व्हायचं होतं त्यांनी आशा सोडली आहे. ते आता म्हणतात की, आम्हाला बळीचा बकरा बनवू नका. दोन वर्ष सत्तेचे मजे तुम्ही घेतले आत्ता दोन महिन्यासाठी तोंडाला पानं पुसणार आणि मतदारसंघांमध्ये आम्ही निवडून येऊ की नाही येऊ? हा त्यांच्यासमोर पेचप्रसंग आहे. मंत्रीपदाचा ताबा घेऊन आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑफिसचा ताबा घेण्यापर्यंत त्यांचं मंत्रीपद संपून जाईल”, असा दावा सचिन अहिर यांनी केला.

शरद पवार यांच्याबद्दल सचिन अहिर काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी भूमिका मांडली. “शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अ‍ॅडजेस्ट करण्याच्या शब्दप्रयोग काय आहे, हा देखील महत्त्वाचा भाग आहे. पण जे सोडून गेलेले आमदार आहेत, त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार उमेदवार म्हणून चांगले असू शकतात. काही भागांमध्ये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोडून गेलेले आमदार आहेत तिथे दुसऱ्या नंबरवर आम्ही आहोत. तर याच्यातला सुतोवाच त्यांनी केलाय. जसं अ‍ॅडजेस्ट आम्ही करू तसं अ‍ॅडजेस्टमेंट त्यांनादेखील करावं लागेल, असं सचिन अहिर म्हणाले.

“विवेक या साप्ताहिक बद्दल भाजपला काय वाटतं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्राउंडवर फिरून, ग्राउंडची परिस्थिती जाणून ते लेख लिहीत असतात. शिवसेनेसोबत फारकत घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश राहीला नाही. भाजप बोध काय घेते ते महत्वाचे, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली. शेकाप नेते जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीत निवडून यायलाच पाहिजे होते. तशीच व्यूहरचना होती. मात्र काँग्रेसने हे मान्य केलेले आहे की कुठेतरी दगाफटका झालेला आहे”, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.