‘नकली शिवसेना’, अजित पवार, निवडणूक आयोग, अरविंद सावंत लोकसभेच्या सभागृहात प्रचंड बरसले
अरविंद सावंत यांनी लोकसभेत सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका केली. यामध्ये अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीवेळी करण्यात आलेली नकली शिवसेनेची टीका, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांमधील फूट, निवडणूक आयोगाची भूमिका या सर्व घटनाक्रमावर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत धडाकेबाज भाषण केलं. अरविंद सावंत यांनी लोकसभेत सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका केली. यामध्ये अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीवेळी करण्यात आलेली नकली शिवसेनेची टीका, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांमधील फूट, निवडणूक आयोगाची भूमिका या सर्व घटनाक्रमावर निशाणा साधला. “महात्मा गांधी यांचं एक वाक्य आहे, स्पिरिचलाईज द पॉलिटिक्स. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करायला उभा आहे तर, थोडासा अंतर्मनात विचार आला की, लोकसभेची निवडणूक खरंच कशी झाली? प्रचार इतक्या खालच्या स्तरावर गेला होता की, मनाला खूप दु:ख व्हायचं. विशेषत: पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे जे विचार प्रकट होत होते ते पाहून मला खूप वाईट वाटायचं. या देशाला आम्ही नेमकं कुठल्या दिशेला घेऊन चाललोय?”, असं अरविंद सावंत म्हणाले.
“पूर्ण देशात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. ते ध्रुवीकरण धर्माच्या नावावर केलं जात होतं. आम्हीसुद्धा हिंदू आहेत. आम्हाला हिंदुत्वाचा गर्व आहे. आम्ही हिंदू आहेत याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्याची घृणा करावी. घृणा पसरवून भिंती उभ्या केल्या जात होत्या, यासाठी ज्या भाषेचा प्रयोग केला जात होता ते पाहून खूप दु:ख वाटत होतं. देशाचे पंतप्रधान मंगळसूत्राची बात करायचे. देशाचे पंतप्रधान म्हणायचे ज्यांच्याकडे जास्त लोक आहेत ते तुमचं मंगळसूत्र खेचून निघून जातील?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
‘उद्धव ठाकरे यांच्यावर लांच्छंद लावलं’
“आमच्या पक्षाला नकली म्हटलं. आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लांच्छंद लावलं. पण एक गोष्ट, आमचे उद्धव ठाकरे ज्याप्रकारे खंबीरपणे उभे राहिले, आमचे शरद पवार, काँग्रेसचे राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी एकत्र येऊन इंडियाची स्थापन केली. तुम्ही सर्व त्यामध्ये आहेत. आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही संविधानाच्या सुरक्षेसाठी उभे आहोत. आम्ही लोकशाहीच्या सुरक्षेसाठी उभे आहोत. आम्ही जुन्या जखामांना खाजून पुन्हा रक्त का काढतोय? याउलट आपण आता नव्या विचारांनी पुढे जायचा हवं”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी सुनावलं.
’75 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि…’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप लगावले. म्हणाले की, त्यांनी 75 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. घोटाळा झाल्याचा आरोप लगावला आणि आठ दिवसांच्या आत तोच व्यक्ती सत्तेत सहभागी झाला. त्यांच्या आमदारांना सत्तेत घेतलं आणि त्या व्यक्तीला राज्याचं अर्थमंत्री केलं”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
‘शिवसेनामधून एक गट फुटून गेला, ते पळून गेले, ते पळपुटे होते’
“शिवसेनामधून एक गट फुटून गेला. ते पळून गेले. ते पळपुटे होते. त्यांना जावून निवडणूक आयोगाने, निवडणूक आयोग हे तर सत्तापक्षाचं गुलाम आहे. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स हे सर्व संस्था गुलाम आहेत. म्हणूनच त्यांनी 146 खासदारांना सस्पेन्ड केलं आणि कायदा पास केला”, अशी टीका सावंत यांनी केली. यावेळी अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले.