कोकणात महाभूंकप, ठाकरेंचा शिलेदार, कोकणातील सर्वात मोठा नेता भाजपात प्रवेश करणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. कारण कठीण काळात उद्धव ठाकरेंना खमकी साथ देणारा नेताच आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे कोकणातील ताकदवान नेते तथा लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजन साळवी यांचा भाजपच्या शिर्डी येथील १२ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित आहे. भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. साळवी यांना गेल्या अडीच वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. राजन साळवी यांना एसीबी आणि ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. तपास यंत्रणांकडून त्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. पण तपास यंत्रणांच्या तपासाला सामोरं जात ते खचले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यामागे अतिशय खमकेपणाने साथ दिली. आपण उद्धव ठाकरे यांच्यामागे कायम असू, असं ते कायम म्हणाले. पण अचानक आता ते भाजपात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी साळवी यांचं कौतुक करण्यात आलं आहे. असं असताना ठाकरेंचा ताकदवान शिलेदाराला आपल्या पक्षात वळवण्यात भाजपला यश येणार असल्याची शक्यता आहे.
नरेश म्हस्के यांचं महत्त्वाचं वक्तव्य
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. “राजन साळवी माझे मित्र आहेत. त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव तसाच आहे. ते स्वभावानुसार वागत आहेत. जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार, नंतर वाऱ्यावर सोडणार. त्यांची बोट बुडणार आहे. ही तर सुरुवात आहे. ओहटी लागायला सुरुवात झाली आहे. राजन कोणत्या पक्षात जाणार ते माहीत नाही. त्यांच्याशी बोलेन. मुंबईतील जे आमदार निवडून आलेत ते देखील सोडणार आहेत”, असा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांची सूचक प्रतिक्रिया
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “राजन साळवी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष घालणार नसेल तर त्या भावनेतून पक्ष बदलाची भावना राजन साळवी यांची झाली असेल. ते भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं निश्चितच भाजपमध्ये स्वागत होईल. चांगल्या लोकांनी पक्षात यावं आणि जनतेसाठी काम करावं ही भूमिका घेणारा आमचा पक्ष आहे. परंतु त्यांचा काय निर्णय झालाय हे माहिती नाही”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
“बाळासाहेबांचा हिंदूत्वाचा विचार उद्धव साहेबांनी सोडला तेव्हापासून अनेक नेते अस्वस्थ होते. अजूनही अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. जेव्हा एखादा पदाधिकारी निवडणुकीला उभा असायचा तेव्हा बाळासाहेब प्रचंड ताकद द्यायचे, विश्वास द्यायचे. पराभव झाल्यानंतर देखील मायेची हात बाळासाहेब फिरवायचे. मात्र या गोष्टी उद्धव साहेबांकडून होताना दिसत नाहीत. आमच्याकडे विश्वास आहे. मोठी नावे आहेत. आमचा पक्ष विश्वासात घेणारा आहे. राजन साळवी यांच्यापेक्षा आणखी कार्यकर्ते पदाधिकारी उबाठामध्ये अस्वस्थ आहेत”, असा दाव प्रवीण दरेकर यांनी केला आहे.