Satara : उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमधील टोलेबाजी सुरुच, उदयनराजेंच्या खासदारकी सोडण्यावर शिवेंद्रराजे म्हणतात…
आम्ही कुणाची घरे फोडली नाहीत, असे वक्तव्य काल उदयनराजेंनी केले होते, त्यानंतर आज शिवेंद्राराजेंनी उदयनराजेंना टोमणा मारला आहे.
सातारा : साताऱ्यातले राजकारण नेहमी चर्चेत असते ते उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमुळे. दोन्ही राजेंमधील राजकीय वैर साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यावर किमान आतातरी हे संपेल असे सर्वांना वाटत होते, मात्र अजूनही एकमेकांना टोमणे मारायला राजे विसरत नाहीयेत. आम्ही कुणाची घरे फोडली नाहीत, असे वक्तव्य काल उदयनराजेंनी केले होते, त्यानंतर आज शिवेंद्राराजेंनी उदयनराजेंना टोमणा मारला आहे.
खासदारकीवरून शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोमणा
शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना नारळफोड्याची उपमा दिल्यानंतर उदयनराजेंनी सुद्धा शिवेंद्रराजेंवर टिका करत त्यांची बुद्धी छोट्या मुलांच्या पेक्षासुद्धा कमी आहे असे म्हटले होते. शिवेंद्रराजे हे बालीश विधानं करत असल्याचं सांगत त्यांनी टीका करताना भान राखायला हवं असं ते म्हणाले होते. मात्र याला शिवेंद्रराजेंनी पुन्हा उत्तर दिलय उदयनराजेंची बुद्धी जर आमच्या पेक्षा जास्त आहे तर लोकांनी नोवडून दिलेलं खासदारकीचं पद सोडून पुन्हा उभं राहून पराभूत झालात. याला काय म्हणायचं? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना केला आहे.
विरोधकांचे उंबरे झिझवले तेव्हा कुठे गेली होती बुद्धी?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध होण्यासाठी दिवाळीचे डब्बे घेवून विरोधकांचे उंबरठे तुम्ही झिझवलेत. तेव्हा कुठं गेली होती अफाट बुद्धी? असा सवालही शिवेंद्रराजेंनी केलाय. उदयनराजे म्हणाले होते, की जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले. मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केली. त्यामुळे लोकांची घरं फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडून लोकांची विकास कामं करणारी गँग चांगली, असा निशाणा शिवेंद्रराजेंवर साधला होता. त्यालाच आज शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.