ओबीसींना पेटवण्यामागे नागपूरवाल्यांचा हात, ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. त्याचा निर्णय 16 तारखेला येईल. त्यावेळी त्या 16 जणांचे काय होईल ते पाहा. त्या 16 जणांची पदे 16 तारखेला जातील. उध्दव साहेबांचा विजय होईल आणि महाराष्ट्रात भूकंप होईल. 16 लोक त्यादिवशी बरबाद होतील.
छत्रपती संभाजीनगर : 2 ऑक्टोबर 2023 | दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. दोन्ही गटांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा दावा केलाय. एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा हा बांद्रा येथील बीकेसी मैदानात घेतला होता. या दसरा मेळाव्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदे गटावर खोचक टीका केलीय. तसेच, ओबीसी समाजाच्या आंदोलनावरून भाजपवरही टीका केलीय.
महाराष्ट्रात काहीही होऊ शकते
शिवाजीपार्क मैदान कुणाला द्यायचा हा निर्णय महापालिका घेणार आहे. गेल्यावेळीही असाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांना बीकेसी मैदानाची निवड करावी लागली. तो शिंदे गट आहे कुठे? मागच्यावेळी त्यांच्या सभेनंतर बीकेसी मैदानात दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या याची आठवण ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी करून दिली. गेली अनेक वर्ष आमचा एक नेता, एक झेंडा आणि एक मैदान आहे. आम्ही ते मैदान सोडणार नाही. पालिकेने तसा काही निर्णय दिलाच तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यांनी काय दाखवले ते महाराष्ट्राने पाहिले
भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत गांजा पिऊन काहीही बोलतात अशी टीका केलीय. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांना गांजा पिताना आशिष शेलारने पकडले का कधी? का तो ही सोबत बसला होता. शेलार काहीही बोलत असतो. संजय राऊत हा प्रामाणिक माणूस आहे. राज्यात सध्या भाजपवाल्यांचीच बदनामी सुरू झाली आहे. भाजपवाल्या त्यांनी काय दाखवले ते महाराष्ट्राने पाहिले अशी खोचक टीका त्यांनी केली.
ओबीसी समाज उठला त्यामागे नागपूरवाले
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले. त्यांचे उपोषण सुरु असतानाच नागपूरमध्ये ओबीसी समाजाने उपोष सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी मुख्यमंत्री गेले. पण, देवेंद्र फडणवीस का गेले नाही? मनोज जरांगे हे प्रामाणिक नेते आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात ओबीसी समाज उठला त्यामागे नागपूरवाले आहेत. त्यांनीच ओबीसींना पेटवले आहे, असा गंभीर आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला.